Nevasa News : नेवासे येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पायी पालखी दिंडी 8 जुलैला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार
Nevasa News : संत ज्ञानेश्वर मंदिराचे प्रमुख वेदांताचार्य महंत देवीदास महाराज म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिंडी सोहळा पंढरपूरकडे रवाना होणार आहे.

नेवासे : नेवासे येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पायी पालखी दिंडी सोमवारी (८ जुलै) पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून, यंदा प्रथमच या दिंडी सोहळ्यासाठी राज्य शासनाकडून वारकऱ्यांच्या सुरक्षितता आणि सोयी-सुविधांसाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे. देहू-आळंदी पालखी सोहळ्याप्रमाणेच विविध शासकीय सुविधा या दिंडीला उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने वारकरी संप्रदायात समाधानाचे वातावरण आहे. संत ज्ञानेश्वर मंदिराचे प्रमुख वेदांताचार्य महंत देवीदास महाराज म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिंडी सोहळा पंढरपूरकडे रवाना होणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पायी दिंडी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच नेवासे पंचायत समिती सभागृहात आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संत ज्ञानेश्वर मंदिर देवस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एक महत्त्वपूर्ण नियोजन व आढावा बैठक पार पडली. हा दिंडी सोहळा सुरक्षित, शिस्तबद्ध आणि भाविकांसाठी सर्व सोयी-सुविधांनी युक्त अधिक कसा करता येईल? याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रामुख्याने दिंडी मार्गावरील मूलभूत सोयी-सुविधा,शुद्ध पिण्याचे पाणी,आरोग्य व्यवस्था, अखंडित वीज पुरवठा,रस्ते दुरुस्ती आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सर्व शासकीय विभागांकडून या दिंडी सोहळ्याच्या पूर्व तयारीचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला. यावेळी तहसीलदार डॉ. संजय बिरादार, गटविकास अधिकारी संजय लखवाल, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, भाजपाचे अंकुश काळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार
वारकऱ्यांसाठी तात्पुरती आरोग्य केंद्रे, फिरती वैद्यकीय पथके आणि आवश्यक औषधसाठा पुरवून दिंडीला शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे व स्नानगृहे, पालखी सोहळा मुक्कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची सुसज्ज मंडप व्यवस्था, दिंडीतील अन्नदानासाठी आणि वारकऱ्यांच्या भोजनासाठी लागणारे गॅस सिलेंडर वाजवी दरात आणि दिंडी प्रमुखांच्या अधिकृत पत्रावर त्वरित उपलब्ध करून देण्याच्या दृष्ठीकोनातून आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी संबंधितांना सूचना केल्या.
दिंडीला अधिक सुरक्षितता गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त, बॅरिकेडिंग आणि सीसीटीव्ही निगराणी ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली. ऊन आणि पावसापासून बचाव करण्यासाठी पालखी मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी मोठे शामियाने व दर्शन मंडप उभारले जाण्याच्या दृष्ठीकोनातून या बैठकीत विचारमंथन करण्यात आले.
तसेच विद्युत व प्रकाश व्यवस्था म्हणून पालखी मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी विजेची व पथदिव्यांची अधिक सोय कशी उभारता येईल बाबतही विशेष नियोजन या बैठकीत आखण्यात आले. यंदाचा हा दिंडी सोहळा मोठा नेत्रदीपक होण्यासाठी प्रशासन अधिक जोमाने कामाला लागलेले आहे. त्यामुळे भाविक – भक्तांमधून मोठा आनंदोत्सव व्यक्त केला जात आहे.
आषाढी आणि कार्तिकी वारीत परंपरेने चालत आलेल्या काही मानाच्या दिंड्यांना राज्य शासन विविध सोयी – सुविधा आणि अनुदान देत असून यंदा ही मान्यता सुद्धा आता संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी सोहळ्याला मिळाल्यामुळे वारकरी संप्रादयातून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील, आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील आणि राज्य मंत्रिमंडळाचे आभार मानले जात आहे.
वारकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त
देहू – आळंदीप्रमाणे परंपरेने चालत आलेल्या काही मानाच्या दिंड्यांना राज्य शासन मान्यता देवून या काही दिंड्यांना विविध सोयी – सुविधा आणि अनुदान देत असून यंदा ही मान्यता संत ज्ञानेश्वर महाराज दिंडीला मिळाल्यामुळे वारकरी संप्रादयातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.





