नितीश कुमारांना मोठा धक्का! वक्फ विधेयकाला जदयूचा पाठिंबा, आता वरिष्ठ नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Waqf Amendment Bill | लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकाला मंजूरी मिळाली आहे. एनडीएचे घटक पक्ष असलेल्या जनता दल युनायटेड (जदयू) आणि टीडीपीच्या खासदारांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केले. मात्र, आता बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (जदयू) पक्षाला मोठा झटका बसला आहे. पक्षाचे वरिष्ठ मुस्लिम नेते कासिम अन्सारी यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
कासिम अन्सारी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र पाठवत पक्षाचे सदस्यत्व सोडत असल्याचे महटले आहे. त्यांनी पत्रात लिहिले की, कोट्यवधी भारतीय मुस्लिमांचा असा विश्वास होता की आपण धर्मनिरपेक्ष विचारधारेचे पुरस्कर्ते आहात, पण हा विश्वास आता तुटला आहे. त्यांनी हे विधेयक पसमांदा (मागासलेले मुस्लिम) विरोधी असल्याचेही म्हटले आहे.
दरम्यान, जदयूने वक्फ सुधारणा विधेयकावर संसदेत आपले मत मांडले होते. लोकसभेत जदयूचे खासदार राजीव रंजन सिंह म्हणाले की, विरोधी पक्ष वक्फ सुधारणा विधेयकाबाबत वेगळ्या प्रकारचा विचार पसरवून देशातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्यांनी दावा केला की, हे विधेयक मुस्लिम विरोधी असल्याचा चुकीचा संदेश दिला जात आहे, तर प्रत्यक्षात हे विधेयक मंजूर झाल्यावर मुस्लिम समुदायाच्या प्रत्येक वर्गाच्या हिताचे रक्षण होईल. वक्फ ही केवळ मुस्लिम संस्था नसून, मुस्लिम हितांचे रक्षण करण्यासाठी तयार केलेले एक न्यास (ट्रस्ट) आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, वक्फ (सुधारणा) विधेयक, 2025 लोकसभेत मंजूर झाले. विधेयकाला 288 विरुद्ध 232 मतांनी सभागृहाची मंजुरी मिळाली. हे महत्त्वाचे विधेयक पारित करण्यासाठी सभागृहाची बैठक रात्री सुमारे दोन वाजेपर्यंत चालली. याव्यतिरिक्त, मुसलमान वक्फ अधिनियम, 1923 रद्द करणारे मुसलमान वक्फ (निरसन) विधेयक, 2024 देखील सभागृहात आवाजी मतदानाने मंजूर झाले.





