वक्फ विधेयकाला गैरहजर राहणे भोवणार? ममता बॅनर्जी तृणमूलच्या 3 खासदारांवर कारवाई करण्याची शक्यता

Waqf Amendment Bill | लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकावर झालेल्या चर्चेदरम्यान आणि मतदानादरम्यान तृणमूल काँग्रेसचे तीन खासदार अनुपस्थित होते. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वातील एक गट याबद्दल नाराज आहे. या तिघांच्या अनुपस्थितीबाबत तृणमूलच्या प्रमुख आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केल्यानंतर पक्ष या तिघांवर कारवाई करू शकतो असे संकेत पक्षातील सूत्रांनी दिले आहेत.
घाटलचे खासदार आणि अभिनेते दीपक अधिकारी उर्फ देव, बीरभूमचे खासदार आणि अभिनेत्री शताब्दी रॉय आणि कूचबिहारचे खासदार जगदीश चंद्र बसुनिया यांचा अनुपस्थित असलेल्या खासदारांमध्ये समावेश होता. यापैकी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बसुनिया यांनी पहिल्यांदाच कूचबिहारमधून विजय मिळवला.
लोकसभेतील तृणमूल काँग्रेसचे मुख्य प्रतोद कल्याण बॅनर्जी म्हणाले की, संसदेत वक्फवरील चर्चेदरम्यान हे तीन सदस्य उपस्थित नव्हते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार यापैकी फक्त देव यांनीच संसदीय पक्षाच्या सदस्याला सांगितले होते की ते शूटिंगसाठी झारखंडमध्ये आहेत. त्यामुळे ते संसदेत उपस्थित राहू शकणार नाहीत. उर्वरित दोन खासदारांनी त्यांच्या अनुपस्थितीबद्दल पक्षाला माहिती दिली नव्हती.
या संदर्भात जगदीश चंद्र बसुनिया म्हणाले की, १ एप्रिल रोजी अचानक मला कळले की दुसऱ्या दिवशी वक्फ विधेयक मांडले जाईल. मी एका कौटुंबिक समस्येत अडकलो होतो, त्यामुळे मी जाऊ शकलो नाही. जर मला थोडे आधी कळले असते तर मी त्या दिवशी संसदेच्या कामकाजाला नक्कीच उपस्थित राहिलो असतो.
या खासदारांवर पक्ष काय कारवाई करेल याबद्दल अद्याप अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. तृणमूल संसदीय पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केल्यानंतरच तीन खासदारांबाबत पुढील कारवाई केली जाईल.





