‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला अमित शहांनी दाखवला हिरवा झेंडा

जम्मू-काश्मीरच्या जनतेला रेल्वेचा होणार फायदा -अमित शहा
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज बहुप्रतिक्षित दिल्ली-कटरा वंदे भारत एक्स्प्रेसच्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रेल्वेचे लोकार्पण केले. यावेळी अमित शहा यांनी वंदे भारत एक्सप्रेसमुळे देशातील इतर भागातील जनतेला ज्याप्रमाणे फायदा होणार आहे त्याच प्रमाणे याचा सर्वात जास्त फायदा हा जम्मू-काश्मीरच्या जनतेला होणार असल्याचे म्हटले आहे.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकात आयोजित कार्यक्रमात अमित शहा यांनी हजेरी लावली आणि दिल्ली ते कटरा या वंदे भारत एक्स्प्रेसला रवाना केले. येत्या ऑक्टोबरपासून या रेल्वेचे नियमित कामकाज सुरू होणार आहे. यावेळी बोलताना त्यांनी महात्मा गांधी यांचा उल्लेख केला. गांधींच्या जीवनातून रेल्वे हटवली तर स्वातंत्र्य चळवळ अपूर्णच राहील असे सांगत गांधींजींना रेल्वेतून हाकलून लावल्यामुळे मोहादास ते महात्मा होण्याचा प्रवासही देशाने पाहिला असे शहा म्हणाले. स्वातंत्र्य चळवळीत बापूंनी रेल्वेचा मोठ्या प्रमाणात वापर केला. बापूंच्या चळवळीत रेल्वेने मोठे योगदान दिले, मग ते चंपारण असोत वा इतर कोणतेही असेही शहा यांनी यावेळी म्हटले. दरम्यान, वंदे भारत विषयी बोलताना ही ट्रेन पूर्णपणे स्वदेशी आहे आणि त्याचा प्रत्येक भाग भारतात बनविला गेला आहे, जो मेक इन इंडियाच्या दर्शनाला प्रतिबिंबित करतो असे त्यांनी यावेळी सांगितले.
कलम 370 हटवल्यापासून जम्मूमधून दहशतवाद निर्मूलन झाला आहे. मोदींनी आज जम्मू-काश्मीरमधील लोकांना एक मोठी भेट दिली आहे. ही गाडी ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. आयआरसीटीसी वेबसाइटवर या ट्रेनचे तिकिट बुकिंग सुरू झाले आहे. वंदे भारत एक्स्प्रेस सुपरफास्ट ट्रेनच्या चार तासापूर्वी प्रवाशांना कटरा येथे पोहोचवेल. म्हविशेष म्हणजे देशात धावणारी ही दुसरी वंदे भारत एक्स्प्रेस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रथम वंदे भारत एक्स्प्रेस 15 फेब्रुवारी रोजी दिल्ली-वाराणसी मार्गावर रवाना झाली.





