बीड कारागृहात वाल्मिक कराडला मारहाण, खरं की सोंग?

बीड – बीड जिल्हा कारागृहात आज सकाळी खळबळजनक घटना घडली. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सूत्रधार वाल्मिक कराड आणि सहआरोपी सुदर्शन घुले यांच्यावर तुरुंगातच हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामागे महादेव गिते आणि अक्षय आठवले हे दोन कैदी असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी हा सर्व प्रकार सोंग असण्याची शक्यता व्यक्त करत आरोपींना फास्टट्रॅक कोर्टातून तात्काळ फाशी देण्याची मागणी केली आहे.
बीड जेलमध्ये नेमकं काय घडलं?
बीड कारागृहात कैद्यांना वेगवेगळ्या बराकीत ठेवले जाते. सोमवारी सकाळी 10:30 ते 11:00 च्या दरम्यान बंदी उठवण्यात आली आणि सर्व कैदी मोकळे सोडले गेले. नाश्त्याच्या वेळी ही सुट्टी असताना महादेव गिते आणि अक्षय आठवले हे दोघे अचानक वाल्मिक कराडवर धावून गेले. त्याला मदत करण्यासाठी सुदर्शन घुले पुढे आला, पण या दोघांनी वाल्मिक आणि सुदर्शनला बेदम मारहाण केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. घटनेनंतर तुरुंगात तणावपूर्ण शांतता आहे. मात्र, जेल प्रशासनाने याबाबत अधिकृत दुजोरा देण्यास नकार दिला आहे.
मनोज जरांगेंचा सनसनाटी दावा
या घटनेनंतर मनोज जरांगे यांनी संशय व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “आज काय झालं हे आम्हाला माहीत नाही. प्रशासनाला याची खरी माहिती असेल. पण हे आरोपी सोंग करणारे आहेत. लोकांना वेड्यात काढण्यासाठी ते कधी दुखापत झाल्याचे सांगतील, कधी हॉस्पिटलमध्ये दाखल होतील, तर कधी दुसऱ्या जेलमध्ये हलवण्याची मागणी करतील. मारहाण झाली नसेल तरी झाल्याचे भासवतील.” त्यांनी पुढे सांगितले की, ही घटना खरी असेल तर गुन्हा दाखल होणे स्वाभाविक आहे, पण प्रशासनाने यावर कठोर कारवाई करावी.
“फास्टट्रॅकवर खटला चालवा, फाशी द्या!”
मनोज जरांगे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला लवकर निकाली काढण्याची मागणी केली. “हे लोक एकमेकांना संपवतील, त्यापेक्षा फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून या आरोपींना तात्काळ फाशी द्या,” असे ते म्हणाले. तसेच, या गुन्हेगारांना सहकार्य करणाऱ्यांवरही कारवाईची मागणी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्याकडे केली आहे.
तुरुंगात तणाव, पण शांतता
सध्या बीड जिल्हा कारागृहात परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले जात आहे. पण या मारहाणीमुळे तुरुंगात तणावाची शांतता पसरली आहे. हल्ल्यामागील कारण आणि त्याचे परिणाम याबाबत तपास सुरू असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती आहे. या प्रकरणाने पुन्हा एकदा संतोष देशमुख हत्याकांड चर्चेत आले असून, आरोपींच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भाजप आमदार सुरेश धस काय म्हणाले –
सुरेश धस यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले की, “वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर बीड कारागृहात हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे. हा वाद तुरुंगात फोन वापरण्यावरून सुरू झाला. महादेव गिते आणि अक्षय आठवले यांनी ही मारहाण केल्याचे समजते. पण प्रशासन वेगळी नावे सांगत आहे. मला खात्रीलायक माहिती आहे की, तुरुंगात दोन टोळ्यांमध्ये हा संघर्ष झाला.” धस यांनी पुढे स्पष्ट केले की, “जेलमध्ये काहीही होऊ शकते. या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे.”
जरांगेंच्या दाव्यावर प्रत्युत्तर –
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या मारहाणीला सोंग असल्याचा दावा केला होता. यावर धस म्हणाले, “जरांगेंनी सोंगाचा आरोप केला असेल, तर त्यांचे म्हणणे त्यांच्यापुरते मर्यादित आहे. पण मी सांगतो, ही घटना खरी आहे. तुरुंगात असे प्रकार घडतातच. याचा अर्थ असा नाही की हे सोंग आहे. प्रशासनाने याची पडताळणी करावी आणि सत्य बाहेर आणावे.”





