nagar | राहुरीच्या उत्तर भागात पावसाची प्रतीक्षा

कोल्हार, (वार्ताहर)- राहुरी तालुक्याच्या उत्तर भागातील कोल्हार खुर्द, चिंचोली, तांभेरे, निंभेरे, गंगापूर, रामपूर आदी भागात शेतकऱ्यांनी सुरुवातीला झालेल्या मृग नक्षत्रात पडलेल्या पावसाच्या भरवशावर सोयाबीन, कपाशी, बाजरी, मूग, मठ अशा पावसाळी पिकांची पेरणी करून ठेवलेली आहे.
मात्र, आता पावसाने विश्रांती घेतली असून, ऊन-सावल्यांचा खेळ सुरू झाला असल्यामुळे मातीतून वर आलेल्या पिकांसह शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून, पावसाने मोठी विश्रांती घेतल्यास जिरायती पट्ट्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
गेल्या १५ दिवसांपूर्वी मृग नक्षत्राच्या पावसाने राहुरी तालुक्याच्या उत्तर भागात दमदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. मशागत केलेल्या रानात शेतकऱ्यांनी पेरणीवर जोर दिला.
मका, कडवळ, मठ, मूग, हुलगा, बाजरी, सोयाबीन, कपाशी अशा नगदी पिकांची लागवड करण्यात आली. दर्जेदार बियाणे आणि खतासाठी मोठा खर्च करून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे.
मात्र, १५ दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाने अचानक विश्रांती घेतली असून, शेतातील पेरणीनंतर अद्याप या परिसराकडे पावसाने पाठ फिरवली. ऊन-सावल्यांचा खेळ सुरु झाला आहे. सोसाट्याचा वारा वाहत असल्यामुळे जमिनीत असलेला ओलावा कमी झाला आहे.
त्यामुळे जमिनीच्या वर डोकावणाऱ्या पिकांनी माना टाकल्या आहेत. जेमतेम पाणी उपलब्ध असलेले शेतकऱ्यांनी आपल्या मोटरी सुरू केल्या असून पिकांना पाणी देण्यास सुरुवात केली आहे.
मात्र तांभेरे, निंभेरे, कनगर, कानडगाव यासारख्या जिरायती भागातील शेतकरी आता उघडीप दिलेल्या पावसाची वाट पाहत असून जमिनीतून वर आलेले कोवळे मोड देखील पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे ते पिके जगवण्यात सक्षम ठरू शकतात.
मात्र, जिरायती भागातील पट्ट्यात लवकरात लवकर दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. या पावसाने जर दांडी मारली तर या भागातील शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे जिरायत पट्ट्यातील शेतकरी हवालदिल झाला असून, दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहे.





