कोपरगाव : शिर्डीच्या साईनाथांचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांची, तसेच कोपरगाव व परिसरातील व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण आणि सामान्य नागरिकांची रेल्वे प्रवासासाठी मोठ्या प्रमाणावर कोपरगाव रेल्वे स्थानकावर अवलंबून असलेली सोय सध्या काही महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे नसल्यामुळे खंडित झाली आहे. परिणामी, नागरिकांना मनमाड, बेलापूर किंवा पुणे यासारख्या इतर स्थानकांवर प्रवासासाठी जावे लागत आहे. ही गैरसोय लक्षात घेता कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ अध्यक्ष ओमप्रकाश तथा काका कोयटे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्याध्यक्ष सुधीर डागा यांच्या हस्ते खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना कोपरगाव रेल्वेस्थानकावर लांबपल्ल्याच्या पाच महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे द्यावेत, अशी मागणी लेखी स्वरूपात करण्यात आली आहे. ही मागणी व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष व कोपरगाव तालुका रेल्वे सल्लागार समिती सदस्य सुधीर डागा यांनी स्थानकप्रमुख भैरव प्रसाद यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात केली आहे. या निवेदनाच्या प्रती आमदार आशुतोष काळे आणि कोपरगाव रेल्वे विभागप्रमुख, अधिकारी यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. कोपरगाव हे शहर शिर्डीपासून अवघ्या १५ किमी अंतरावर असल्यामुळे साईभक्तांची मोठी गर्दी वर्षभर असते. त्याचप्रमाणे, कोपरगाव औद्योगिकदृष्ट्याही विकसित होत असून, अनेक शेतकरी, व्यापारी व व्यावसायिक दररोज रेल्वेने प्रवास करत आहेत. विद्यार्थ्यांसाठीही हे स्थानक अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे येथून देशाच्या विविध दिशांना जाणाऱ्या गाड्यांचा थांबा असणे आवश्यक आहे. काकीनाडा एक्सप्रेस, सिकंदराबाद एक्सप्रेस, विजयवाडा एक्सप्रेस, कामायनी एक्सप्रेस, पाटलीपुत्र एक्सप्रेस या गाड्यांचे थांबे कोपरगावसारख्या महत्त्वाच्या स्थानकावर नसणे ही दुर्दैवाची बाब असून, थांबा दिल्यास नागरिकांचा प्रवास सुविधा अधिक सुकर होईल.रेल्वे प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने पाहून कोपरगाव स्थानकावरील गाड्यांचे थांबे निश्चित करावेत, अशी अपेक्षा कोपरगावकर नागरिक आणि प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.