Wai News : शॉपिंग सेंटरमध्ये तळीरामांचा ‘ओपन बार’; सोन्या-चांदीच्या दुकानांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Wai News : मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच जागे व्हा"; जिल्हा पोलीस प्रशासनाकडे अतिरिक्त बंदोबस्त वाढवण्याची वाईकरांची मागणी.

Wai News – शहरातील गजबजलेल्या परिसरातील यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने ओळखले जाणारे शॉपिंग सेंटर सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. हे ठिकाण खरंच शॉपिंग सेंटर आहे की दारुड्यांचा अड्डा असा संतप्त सवाल येथील दुकानदारांकडून उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या शॉपिंग सेंटरमधील अनेक दुकानांसमोर दररोज रात्री तळीरामांचा अक्षरशः मेळा भरत आहे.
दुकानदार दुकान बंद करून गेल्यानंतर काही सराईत मद्यपी दुकानांसमोरच बसून उघडपणे मद्यपान करतात. विशेष म्हणजे, रात्री उशिरापर्यंत मद्यपींचे टोळके येथे जमा होत असून अनेकदा किरकोळ कारणावरून जीवघेणी भांडणेही होत आहेत. याशिवाय मद्यपान करून जोरजोरात आरडाओरड करणे, मोबाइलवर मोठ्या आवाजात गाणी लावून वेडावाकडा नाच करणे, गाड्यांची रेस लावून मोठा आवाज करणे हे प्रकार येथे रोजचेच झाले आहेत.
त्यामुळे परिसरातील शांतता पूर्णपणे भंग होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मद्यपींकडून केवळ गोंधळच घातला जात नाही, तर रिकाम्या बाटल्या व कचरा दुकानांसमोर टाकून दिला जातो. परिणामी दुसऱ्या दिवशी दुकानदारांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. या प्रकारामुळे ग्राहकांमध्येही नकारात्मक प्रतिमा निर्माण होत असून व्यवसायावर परिणाम होत असल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली आहे.
दुकानदारांनी यापूर्वी अनेकदा संबंधित प्रकारांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले असल्याचे सांगितले. मात्र, त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. उलट, काही मद्यपींकडून सीसीटीव्ही कॅमेरे तोडफोड करण्याचे प्रयत्न वारंवार होत आहेत. ज्यामुळे सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. विशेष बाब म्हणजे, या परिसरात अनेक सोन्या- चांदीची दुकाने आहेत.
याच भागात चोरीच्या घटना देखील घडल्याने व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे. ‘अशा प्रकारांना वेळीच आळा घातला नाही, तर मोठी अनिष्ट घटना घडण्याची भीती आहे,’ असा इशारा दुकानदारांनी दिला आहे. याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी दुकानदारांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे. रात्रीच्या वेळी गस्त वाढवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
बंदोबस्त वाढविण्याची मागणी
शहरात अपुऱ्या पोलीस फौजफाट्यामुळे हुल्लडबाजीचे प्रकार वाढत असल्याचे चित्र आहे. मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावून वाहन चालवणे, ट्रिपल सीट मोटरसायकल चालवणे तसेच अल्पवयीन मुलांकडून मोठ्या प्रमाणात दुचाकी चालवली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांचा यात मोठा सहभाग असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने वाई शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करावा, अशी मागणी वाईकर नागरिकांतून जोर धरत आहे.






