Wagholi Murder : मित्रांनीच घात केला! वाघोलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा निर्घृण खून

प्रभात वृत्तसेवा
पुणे – वाघोलीतील उबाळेनगर परिसरात रविवारी पहाटे धक्कादायक घटना घडली. रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा धारदार शस्त्र आणि दगडाने मारहाण करून खून करण्यात आला. विशेष म्हणजे हा खून त्याच्या तीन मित्रांनीच केला आहे.बादल शेख (२०, रा. खराडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो फळविक्रीचा व्यवसाय करायचा, त्याच्यावर पाच वर्षांपूर्वी एक गुन्हा दाखल होता. याप्रकरणी त्याचे मित्र पटेल, जाधव आणि आणखी एका विरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बादल हा मित्रांसोबत कृष्णा लॉजखालील प्यासा बारमध्ये मद्यपान करण्यास आला होता. मद्यपान केल्यावर तो एकच्या सुमारास घरी गेला होता. त्यानंतर त्याला मित्रांनी पुन्हा बारसमोर बोलावून घेतले. तेथे धारदार शस्त्र आणि दगडाने त्याच्या डोक्यावर वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटना कळवताच वाघोली पोलिसांनी तेथे धाव घेतली. याप्रकरणी बारमधील कर्मचाऱ्याने वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप करपे करत आहेत.
पहाटेपर्यंत दारूविक्री..
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरातील बार रात्री एकला बंद झाले, तरी मागच्या दाराने पहाटेपर्यंत दारू दिली जाते. यामुळे परिसरात गुन्हेगारी वाढली आहे. मागच्या दाराने मद्य पुरवणाऱ्या बारवर कारवाई करण्यात यावी.





