Wagholi Fire Incident : वाघोलीत मध्यरात्री दुकानाला भीषण आग, झोपलेल्या तरुणाचा गुदमरून मृत्यू
Wagholi Fire Incident : वाघोली येथील आव्हाळवाडी फाट्यावर रेडियम बोर्डाच्या दुकानाला मध्यरात्री लागली आग; धुरामुळे गुदमरून नांदेडच्या २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू.
Updated On:

Wagholi Fire Incident – वाघोली येथील आव्हाळवाडी फाट्यावर मध्यरात्री लागलेल्या आगीत दुकानात झोपलेल्या तरुण कामगाराचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एकनाथ दिलीप राठोड (वय 24, सध्या रा. वाघोली, मूळगाव नांदेड) असे मृत कामगाराचे नाव आहे. संबंधित दुकानात साईनबोर्ड व रेडियम बोर्ड तयार करण्याचे काम चालत होते.
एकनाथ राठोड हा दुकानातच झोपलेला असताना मध्यरात्री अचानक आग लागली. काही वेळातच दुकानात मोठ्या प्रमाणात धूर साचला. धुरामुळे त्याचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. आग लागल्याचे लक्षात येताच दुकानमालक व परिसरातील नागरिक तातडीने घटनास्थळी जमा झाले. त्यांनी पाणी ओतून आग आटोक्यात आणली.
दरम्यान, एकनाथ याला तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किट आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत दुकानातील काही साहित्य व यंत्रसामग्री जळून खाक झाली आहे.





