Wagholi Crime: ‘आम्ही चौघे भाई आहोत!’ वाघोलीत घरासमोर धारदार हत्यारे फिरवून दहशत; चौघांवर गुन्हा
Wagholi Crime: केसनंद फाटा येथे भारत पेट्रोल पंपासमोरील रहिवाशाच्या घरासमोर जाऊन दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांची गुंडगिरी; हवेत शस्त्रास्त्रे फिरवून परिसरात पसरवली दहशत.

Wagholi Crime- घरासमोर येऊन शिवीगाळ करत आता तुला सोडणार नाही, आम्ही चौघे भाई आहोत, अशी धमकी देत धारदार लोखंडी हत्यारे हवेत फिरवून दहशत निर्माण केल्याची घटना केसनंद फाटा परिसरात घडली. याप्रकरणी हरी, रोहित, बंटी आणि कुंदन (पूर्ण नाव-पत्ता माहीत नाही) यांच्याविरुद्ध वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ईश्वर कापसे (वय 34) यांनी फिर्याद दिली आहे. ते केसनंद फाटा येथील भारत पेट्रोल पंपासमोरील मोकळ्या जागेत कुटुंबासह राहतात. 26 सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास ते घरात जेवण करत असताना दोन दुचाकींवरून चार जण त्यांच्या घरासमोर आले. दुचाकींच्या सायलेन्सरचे मोठे आवाज करत तसेच फटाके फोडल्यासारखा आवाज करून त्यांनी परिसरात गोंधळ घातला.
त्यानंतर कापसे यांच्याशी वाद घालत चौघांपैकी एकाने दुचाकीच्या डिक्कीतून दोन धारदार लोखंडी हत्यारे काढली. शिवीगाळ करत धमकी देत त्या व्यक्तीने दोन्ही हत्यारे हवेत फिरवली. या प्रकारामुळे घाबरलेल्या नागरिकांनी तेथून पळ काढला. घटनेनंतर कापसे यांनी रात्री वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.




