Wagholi : वाघोलीतील महिला अत्याचार प्रकरणाला नवे वळण; आरोपीला तात्पुरता जामीन
Wagholi : वाघोलीतील महिला अत्याचार प्रकरणात आरोपी संतोष सातव यांना अटी-शर्तींवर तात्पुरता जामीन मंजूर. रेकॉर्डिंग आणि जिल्हाध्यक्षांच्या उल्लेखामुळे प्रकरण चर्चेत.

Wagholi : वाघोलीतील महिला अत्याचाराच्या प्रकरणात आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटी-शर्तींवर तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ सप्टेंबर रोजी होणार आहे.
वाघोली परिसरातील एका युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नाचे खोटे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संतोष हिरामण सातव (वय ४५, रा. आव्हाळवाडी रोड, वाघोली) यांच्याविरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सातव हे एका राष्ट्रीय पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते असल्याचे सांगितले जाते.
न्यायालयाने आरोपीला प्रकरणाशी संबंधित कोणालाही धमकावू नये किंवा त्यांच्यावर प्रभाव टाकू नये, पोलिसांच्या तपासात सहकार्य करावे आणि तपासासाठी पोलिसांनी बोलावल्यास हजर राहावे, अशा अटी घातल्या आहेत.
दरम्यान, फिर्यादी महिलेने तक्रारीत एका राष्ट्रीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाच्या नावाचा दोन वेळा उल्लेख केल्याचे समोर आले आहे. तसेच धमकावल्याचे रेकॉर्डिंग असल्याचाही दावा तिने तक्रारीत केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
या प्रकरणात जिल्हाध्यक्षांची चौकशी होणार का आणि संबंधित रेकॉर्डिंगमधून नेमके काय स्पष्ट होणार, याकडे लक्ष लागले आहे. तपास अधिकारी पीएसआय हवाले यांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने रेकॉर्डिंग ताब्यात घेऊन संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले.





