Wagholi Crime: बॅगेत सापडली ५ दिवसांची नवजात बालिका! आव्हाळवाडीत धक्कादायक प्रकार..दोघांविरुद्ध गुन्हा
Wagholi Crime: तोंड रुमालाने बांधून दुचाकीवरून आलेल्या दोघांचा वाघोली पोलिसांकडून शोध सुरू; मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ.

Wagholi Crime – आव्हाळवाडी परिसरातील सातववस्ती येथे अवघ्या पाच ते सहा दिवसांच्या नवजात बालिकेला काळ्या रंगाच्या बॅगेत टाकून रस्त्याच्या कडेला सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आकाश कोळी यांनी फिर्याद दिली आहे.
ते रिक्षाचालक असून, 25 सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास मांजरी येथून प्रवासी घेऊन पुणे स्टेशनच्या दिशेने जात होते. सातववस्ती परिसरात त्यांच्या रिक्षासमोर दुचाकीवरून जाणार्या दोन व्यक्तींनी रस्त्याच्या कडेला काळ्या रंगाची बॅग टाकून तेथून पलायन केले. संशय आल्याने कोळी यांनी रिक्षा थांबवून बॅगजवळ जाऊन पाहिले. बॅगेत पाय दिसत असल्याने आणि बाळाच्या रडण्याचा आवाज येत असल्याने त्यांनी बॅग उघडली.
त्यामध्ये पांढर्या कापडात गुंडाळलेली पाच ते सहा दिवसांची नवजात बालिका आढळून आली. कोळी यांनी बालिकेला बॅगसह तत्काळ वाघोली पोलिस ठाण्यात आणले. बालिकेला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दुचाकीवरील दोन्ही व्यक्तींनी तोंडाला रुमाल बांधलेला असल्याने त्यांची ओळख पटलेली नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.





