नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कथित मतचोरीच्या विरोधातील आक्रमक पवित्रा आणखी धारदार बनवला. भाजपच्या डीएनएमध्ये मतचोरी असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपकडे सत्ता आहे. तो पक्ष मतचोरीत गुंतला आहे. मात्र, आम्ही सत्याच्या बाजूने ठामपणे उभे आहोत. मोदी सरकारला सत्तेवरून हटवूच, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला. निवडणुकांमध्ये अनियमितता, मतचोरी घडत असल्याचा आरोप कॉंग्रेस आणि त्या पक्षाचे नेते राहुल यांनी लावून धरला आहे. कथित मतचोरी विरोधातील मोहीम आणखी तीव्र बनवण्याच्या उद्देशातून कॉंग्रेसने रविवारी व्होट चोर, गद्दी छोड रॅलीचे आयोजन केले. दिल्लीतील रामलीला मैदानावरील त्या रॅलीत पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी निवडणूक आयोगासह भाजप, मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. राहुल यांनी थेट नामोल्लेख करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीरसिंग संधू, विवेक जोशी या निवडणूक आयुक्तांनाही घेरले. तिघेही भाजपसाठी कार्य करत असल्याचा दावा त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पराभव करण्यासाठी आम्ही सत्य आणि अहिंसेचा आधार घेऊ.