Vision Premier League : लायन्स् इलेव्हनचा सुपरओव्हरमध्ये विजय!

पुणे – व्हिजन स्पोर्ट्स सेंटर तर्फे आयोजित दुसर्या व्हिजन प्रिमिअर लीग अजिंक्यपद २५-२५ षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत लायन्स् इलेव्हन संघाने जॅग्वॉर्स इलेव्हन संघाचा सुपरओव्हरमध्ये रोमहर्षक पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला.
व्हिजन क्रिकेट अॅकॅडमी मैदान, सनसिटी रोड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उत्कंठावर्धक झालेल्या आणि शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात अमोघ नातू याच्या अचूक कामगिरीच्या जोरावर लायन्स् इलेव्हन संघाने विजय मिळवला. पहिल्यांदा खेळताना लायन्स् इलेव्हनने १३६ धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये मिहरी घाटपांडे याने ५१ धावांची तर रणवीर मते याने २३ धावांची खेळी केली. श्लोक बोकरे (नाबाद ३९ धावा), शर्विल गोसावी (२७ धावा) आणि देवल देशपांडे (१७ धावा) यांनी फलंदाजीमध्ये योगदान देत जॅग्वॉर्स इलेव्हनला विजयाच्या समीप नेले.
अखेरच्या षटकामध्ये १० धावांची आवश्यकता असताना अमोघ नातू याने दबावाखाली सुरेख गोलंदाजी केली. अमोघने या षटकामध्ये देवल देशपांडे याला त्रिफळाचीत केले आणि पहिल्या ५ चेंडूमध्ये ५ धावा दिल्या. अखेरच्या चेंडूवर जिंकण्यासाठी जॅग्वॉर्सला ५ धावा आवश्यक होत्या. या चेंडूवर वरद शिरसाट याने चौकार मारला आणि सामना ‘टाय’ झाला.
सुपर ओव्हरमध्ये जॅग्वॉस इलेव्हनला १ षटकात चारच धावा करता आल्या. लायन्स् इलेव्हनच्या रणवीर मते (नाबाद ५ धावा) आणि शौनक राजे (नाबाद ३ धावा) यांनी आवश्यक धावा पूर्ण करून संघाला विजय मिळवून दिला. आशिष गुप्ता याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर टायगर्स इलेव्हन संघाने लिंक्सेस् इलेव्हन संघाचा ८६ धावांनी पराभव करून विजयी कामगिरी केली.
संक्षिप्त धावफलक :
लायन्स् इलेव्हनः २५ षटकात १० बाद १३६ (मिहीर घाटपांडे ५१, रणवीर मते २३; देवल देशपांडे २-१६, शर्विल गोसावी २-१०) सुपर ओव्हरमध्ये वि.वि. जॅग्वॉर्स इलेव्हनः २५ षटकात ९ बाद १३६(श्लोक बोकरे नाबाद ३९, शर्विल गोसावी २७; अमोघ नातू ३-३३, हर्ष चौधरी ३-१८);
सुपर ओव्हर : जॅग्वॉस इलेव्हनः १ षटकात १ बाद ४ (आशय शेडगे नाबाद १, वरद शिरसाट नाबाद १; अमोघ नातू १-४) पराभूत वि. लायन्स् इलेव्हनः १ षटकात बिनबाद ८ (रणवीर मते नाबाद ५, शौनक राजे नाबाद ३); सामनावीर अमोघ नातू




