Vision Premier League : लायन्स् इलेव्हन उपांत्य फेरीत…

पुणे – व्हिजन स्पोर्ट्स सेंटर तर्फे आयोजित दुसर्या ‘व्हिजन प्रिमिअर लीग’ अजिंक्यपद २५-२५ षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत लायन्स् इलेव्हन, टायगर्स इलेव्हन, लिंक्से्स इलेव्हन आणि लेपडर्स इलेव्हन या संघांनी गुणतक्त्यामध्ये आघाडी घेत स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला. या स्पर्धेत शर्विल गोसावी याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर जॅग्वॉर्स इलेव्हनने लेपर्ड्स इलेव्हन संघाचा ११९ धावांनी पराभव केला.
शर्विल याने १० धावांमध्ये ५ गडी बाद करून चमकदार गोलंदाजी केली. रणवीर मते याच्या ४५ धावांच्या जोरावर लायन्स् इलेव्हन संघाने टायगर्स संघाचा २३ धावांनी पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. आशिष गुप्ता याच्या कामगिरीच्या जोरावर टायगर्स इलेव्हन संघाने जॅग्वॉर्स इलेव्हनचा ६ गडी राखून पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
वेदांत गावडे याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर लेपर्ड् इलेव्हनने लिंक्से्स इलेव्हन संघाचा ७ गडी राखून पराभव केला आणि स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. वेदांत गावडे याने १७ धावात ५ गडी बाद केले आणि लिंक्से्स इलेव्हन संघाचा डाव ९० धावांवर संपुष्टात आणला. लेपर्ड्स इलेव्हनने हे आव्हान १५.४ षटकात व ३ गडी गमावून पूर्ण केले. अदवय सोनावणे (नाबाद ४२ धावा) आणि दुर्वेश सहानी (२५ धावा) यांनी संघाला सहज विजय मिळवून दिला.



