Vision Premier League : लायन्स् इलेव्हन, लेपडर्स इलेव्हन अंतिम फेरीत…

पुणे – व्हिजन स्पोर्ट्स सेंटर आयोजित दुसर्या ‘व्हिजन प्रिमिअर लीग’ अजिंक्यपद २५-२५ षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत लायन्स् इलेव्हन आणि लेपडर्स इलेव्हन या संघांनी अनुक्रमे लिंक्सेस् इलेव्हन आणि टायगर्स इलेव्हन या संघांचा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
व्हिजन क्रिकेट अॅकॅडमी मैदान, सनसिटी रोड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अद्वय सोनावणे याच्या नाबाद ८४ धावांच्या जोरावर लेपर्डस् इलेव्हन संघाने टायगर्स इलेव्हन संघाचा ८ गडी राखून सहज पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना टायगर्स इलेव्हनने २५ षटकात १५७ धावा केल्या. यामध्ये सार्थक वांजळे (६७) तर, ऋषभ भोसले (नाबाद ५७) यांनी डावाला आकार दिला. लेपर्डस् इलेव्हनने २२.२ षटकात व २ गडी गमावून हे आव्हान पूर्ण केले.
अद्वय सोनावणे याने १२ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ८४ धावांची खेळी करून संघाला एकहाती विजय मिळवून दिला. शुभम सिंग (२२) आणि वेदांत गावडे (नाबाद १८ धावा) यांनीही दुसर्या बाजूने उत्तम साथ दिली. अमोघ नातू याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर लायन्स् इलेव्हनने लिंक्सेस् इलेव्हनचा ९७ धावांनी सहज पराभव केला. लायन्स् इलेव्हनने १६० धावांचे लक्ष्य उभे केले.
यामध्ये शौनक राजे याने ८९ धावांची खेळी केली. या आव्हानसमोर लिंक्सेस् इलेव्हनचा डाव ६३ धावांवर गडगडला. अमोघ नातू याने २४ धावांमध्ये ६ गडी बाद करून संघाच्या डावाला खिंडार पाडले आणि संघाला सहज विजय मिळवून दिला.





