West Indies in Australia, 1st Test Stumps day 2 : शमर जोसेफने कसोटीत ऑस्ट्रेलियन फलंदाजीला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. अवघ्या वर्षभरापूर्वी सुरक्षा रक्षक असलेल्या वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शामर जोसेफने स्टीव्ह स्मिथसह एकूण पाच ऑस्ट्रेलियन फलंदाजांना आपल्या कसोटी पदार्पणातच आपले बळी बनवले. वेस्ट इंडिजकडून कसोटी क्रिकेट खेळण्यापर्यंतचा शमरचा प्रवास खूपच प्रेरणादायी होता. त्याने कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर स्टीव्ह स्मिथला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
सध्या ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अॅडलेडमध्ये सुरू आहे. या सामन्याद्वारे वेस्ट इंडिजच्या शामर जोसेफने कसोटी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात त्याने कहर केला. शमरने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन भूमीवर पाच ऑस्ट्रेलियन फलंदाजांना आपले बळी बनवले. कसोटीच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजाने स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, मिचेल स्टार्क आणि नॅथन लियॉन यांना आपले बळी बनवले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रवास सोपा नव्हता…
आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्या डावात पाच बळी घेणाऱ्या शमरचा प्रवास इतका सोपा राहिलेला नाही. याआधी शमर हा सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता. जानेवारी 2023 मध्ये त्याने सिक्युरिटी गार्डची नोकरी सोडली आणि बरोबर एक वर्षानंतर म्हणजेच जानेवारी 2024 मध्ये त्याने आपल्या गोलंदाजीने ऑस्ट्रेलियन फलंदाजी उद्ध्वस्त केली. वेस्ट इंडिजच्या राष्ट्रीय संघात सामील होण्यापूर्वी शमरने केवळ पाच प्रथम श्रेणी सामने खेळले. पाच प्रथम श्रेणी सामन्यांच्या 10 डावात गोलंदाजी करत त्याने 21.80 च्या सरासरीने 21 विकेट्स घेतल्या आणि वेस्ट इंडिज संघात येण्याचा आपला मार्ग सोप्पा केला.
वेस्ट इंडिज 22 धावांनी पिछाडीवर…
कसोटीबद्दल बोलायचे झाल्यास, वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात 188 धावांत आटोपला. कर्क मॅकेन्झीने संघासाठी सर्वात मोठी 50 धावांची खेळी खेळली. याशिवाय पाच विकेट घेणाऱ्या शमर जोसेफने 11व्या क्रमांकावर फलंदाजीस उतरल्यानंतर देखील अनपेक्षित कामगिरी करून दाखवली. त्याने फलंदाजीत संघासाठी महत्वपूर्ण 36 धावा केल्या. यादरम्यान त्याने 1 षटकार आणि 3 चौकार ठोकले. 11व्या क्रमांकावरची ही सर्वात मोठी खेळी ठरली. याआधी देवेंद्र बिशूने 2011 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी पदार्पणात 11व्या क्रमांकावर फलंदाजी करताना 67 चेंडूत 24 धावा केल्या होत्या. आता तो विक्रम जोसेफने मोडीत काढत आपल्या नावावर केला आहे.
A good day with the ball, but a tough one with the bat for the #MenInMaroon
WI fight again tomorrow #AUSvWI pic.twitter.com/9Zmlma6GPB
— Windies Cricket (@windiescricket) January 18, 2024
प्रत्युत्तरात पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाला वेस्ट इंडिजने 283 धावांत सर्वबाद केले. यामध्ये शमरने वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक 5 बळी घेतले. याशिवाय जस्टिन ग्रीव्हज आणि केमार रोचने प्रत्येकी 2-2 बळी घेतले. तर अल्झारी जोसेफला 1 यश मिळाले. 2009 नंतर ही पहिलीच वेळ होती जेव्हा वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर कसोटीत ऑल आउट केले होते.
त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या दिवसअखेर 6 विकेट्सवर 73 धावा झाल्या होत्या. सध्या वेस्ट इंडिज 22 धावांनी पिछाडीवर आहे.
First ball, first Test wicket! https://t.co/W83GedwFEZ
— Windies Cricket (@windiescricket) January 17, 2024
अन् 85 वर्षांपूर्वीच्या विक्रमाची केली बरोबरी….
या सामन्यात वेस्ट इंडिजचा नवोदित वेगवान गोलंदाज शमर जोसेफने इतिहास रचला. त्याने आपल्या पदार्पणाच्या कसोटीतील पहिल्याच चेंडूवर स्टीव्ह स्मिथला स्लिपमध्ये झेलबाद करून पहिल्या बळीची नोंद केली. तो कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा जगातील 23 वा तर वेस्ट इंडिजचा दुसरा गोलंदाज ठरला. जोसेफच्या आधी 1939 मध्ये विंडिजकडून पदार्पण करताना टायरेल जॉन्सन यांनी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर वॉल्टर कीटन यांना बाद केले होते.