विशाल अग्रवाल याला आणखी एका गुन्ह्यात अटक

पुणे : पोर्शे प्रकरणतील अल्पवयीन मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल याला आणखी एका गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली आहे. जमीन व्यवहारात फसवणूक करत तुरुंगात पाठवून देण्याची धमकी दिल्या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणात यापूर्वी त्याचा सहकारी जसप्रीतसिंग राजपाल याला अटक करण्यात आली आहे.
मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल याच्यावरही या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल आहे. दरम्यान त्याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी बचाव पक्षातर्फे ॲड. मिलिद पवार यांनी युक्तीवाद केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने विशाल याची रनावगी न्यायलयीन कोठडीत केली. कोंढवा भागातील जमिनीच्या व्यवहारातही १ कोटी ३२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा हा प्रकार आहे. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली होती.
याबाबत मुश्ताक शब्बीर मोमीन (वय ४५, रा. कौसरबाग, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विशाल याला लष्कर न्यायालयात हजर केले. त्यावेळी पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षाने केली. यास बचाव पक्षाने विरोध केला. हा गुन्हा पूर्णपणे खोटा आहे. घटनेनंतर पाच वर्षांनी फिर्याद दिली आहे. केवळ अग्रवाल कुटुंबियांना त्रास देण्याचा उद्देश यामध्ये दिसून येत आहे. त्यामुळे आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याची मागणी ॲड. मिलिद पवार यांनी केला.





