‘सर्वच शाळांमध्ये आता विशाखा समिती’; शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची घोषणा

मुंबई – बदलापूरमधील संतापजनक घटनेनंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. सरकारने या प्रकरणी शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी राज्यभरातील शाळांमध्ये कॉर्पोरेट कार्यालयांच्या धर्तीवर विशाखा समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
या समित्यांमध्ये इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थिनी प्रतिनिधींचा समावेश असेल, असे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.
ते पुढे म्हणाले, बदलापूरमधील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेची माहिती मिळताच मी शालेय शिक्षण विभागाची बैठक बोलावली आहे. या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात केली जाईल.
आरोपी अक्षयवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून, मी त्यांना या घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे, असेही केसरकर म्हणाले.
कॉर्पोरेट कार्यालयाच्या धर्तीवर समिती
सरकार या प्रकरणी कॉर्पोरेट कार्यालयांच्या धर्तीवर सर्व शाळांमध्ये विशाखा समिती स्थापन करेल. त्यात नववी व दहावीच्या विद्यार्थिनी प्रतिनिधींचा समावेश असेल.
या प्रकरणी मी तक्रार दाखल करण्यात दिरंगाई करणाऱ्या पोलिस निरीक्षकांना निलंबित करण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे करणार आहे. घटना घडलेल्या शाळेतील सीसीटीव्ही बंदावस्थेत आढळलेत. त्यावरही योग्य ती कारवाई केली जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.
तीन शिक्षिकांवर कारवाई
ही घटना 13 ते 16 ऑगस्ट दरम्यान घडली. त्यानंतर 18 ऑगस्ट रोजी यासंबंधीची तक्रार करण्यात आली. पोलिसांनी पीडित कुटुंबाची तक्रार घेण्यास 12 तासांचा विलंब केल्याचा आरोप आहे. त्यानुसार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे.
शाळेलाही नोटीस बजावण्यात आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिकेसह 3 शिक्षिकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, असेही केसरकर यावेळी म्हणाले.





