CSK vs RCB : ‘तो लवकर आला, खरंतर तो…’, सीएसकेच्या पराभवानंतर वीरेंद्र सेहवागने उडवली धोनीची खिल्ली

CSK vs RCB Virender Sehwag taunts MS Dhoni : आयपीएल २०२४ मध्ये शुक्रवारी रात्री चेन्नई सुपर किंग्जला त्यांच्या घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध दारुण पराभव पत्करावा लागला. या ५० धावांच्या पराभवादरम्यान सीएसकेच्या फलंदाजीला खूप संघर्ष करावा लागला. जेव्हा संघ अडचणीत होता आणि त्यांना जलद धावा काढायच्या होत्या, तेव्हा महेंद्रसिंग धोनी स्वतः फलंदाजीला आला नाही. तो नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि तोपर्यंत सामना सीएसकेच्या हातून गेला होता. आता धोनीच्या या दृष्टिकोनामुळे वीरेंद्र सेहवागने त्याची खिल्ली उडवली आहे.
वीरेंद्र सेहवागने धोनीची उडवली खिल्ली –
सामन्यानंतर क्रिकबझशी बोलताना भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग म्हणाला, “तो लवकर आला. खरंतर तो १९व्या किंवा २०व्या षटकात फलंदाजी करायला येतो. जर तो आज १६ व्या षटकात आला होता, तर तो मग लवकरच आला होता. एकतर तो लवकर आला किंवा त्याच्या फलंदाजांनी खूप लवकर विकेट्स गमावल्या.”जेव्हा सेहवाग हे बोलत होता, तेव्हा तिथे उपस्थित असलेले सर्वजण हसत होते.
सेहवागने धोनीला मारला टोमणा –
सेहवागने त्याचे शब्द थोडे बदलले पण तो धोनीची खिल्ली उडवत असल्याचे स्पष्ट दिसत होते. तथापि, नंतर सेहवागने याबद्दल थोडे अधिक तपशीलवार सांगितले. वीरेंद्र सेहवागने म्हटले की, हे कदाचित सीएसकेच्या रणनीतीचा एक भाग आहे. सेहवागच्या मते, धोनी किती षटकं फलंदाजी करेल हे आधीच ठरवले गेले असते. त्यामुळे सामन्याच्या परिस्थितीचा त्यावर कोणताही परिणाम होणार नव्हता.
हेही वाचा – CSK vs RCB : विराट कोहलीने आरसीबीच्या ऐतिहासिक विजयानंतर केला जबरदस्त डान्स, VIDEO होतोय व्हायरल
वीरेंद्र सेहवाग पुढे म्हणाला की, “हा निर्णय त्याने आणि त्याच्या टीमने घेतला असावा की एमएस धोनी फक्त ठराविक चेंडूंचा सामना करेल आणि तो फक्त ठराविक वेळ फलंदाजी करेल. तेच ते करत आहेत. आता तुम्ही लवकर विकेट गमावायची की उशिरा हे तुमच्यावर अवलंबून आहे. तो फक्त १७ व्या किंवा १८ व्या षटकापर्यंत येईल. आपण सहसा त्याला १८ व्या किंवा १९ व्या षटकात पाहतो, पण आज तो दोन षटके आधीच आला. मला याचे आश्चर्य वाटले नाही.”





