Virat Kohli Video : वडोदरा विमानतळावर विराट कोहलीला घेरले चाहत्यांनी, सुरक्षा रक्षकांची धावपळ, पाहा VIDEO

Virat Kohli video viral after reaches vadodara airport : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ११ जानेवारीपासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली वडोदरा येथे पोहोचला आहे. विराट वडोदरा विमानतळावर उतरताच त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली, ज्यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विराटला चाहत्यांनी घातला घराडा –
विराट कोहलीच्या लोकप्रियतेची प्रचिती बुधवारी वडोदरा विमानतळावर पुन्हा एकदा आली. काळा टी-शर्ट आणि काळा चष्मा अशा ‘कूल’ लूकमध्ये विराट विमानतळाबाहेर पडला. मात्र, आपल्या लाडक्या खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी आणि सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांनी त्याला चारही बाजूंनी घेरले.
#WATCH | Gujarat: Former Indian Captain and Star Cricketer Virat Kohli arrives at Vadodara for Team India’s ODI match against New Zealand on 11th January. pic.twitter.com/cQbhCghMZy
— ANI (@ANI) January 7, 2026
चाहत्यांच्या प्रचंड गर्दीमुळे विराटला त्याच्या गाडीपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. यावेळी तो काहीसा अस्वस्थही दिसत होता. अखेर सुरक्षा रक्षकांनी कडे करून विराटला सुरक्षितपणे कारपर्यंत पोहोचवले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
विराट कोहली जबरदस्त फॉर्म –
विराट कोहली सध्या आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सुरुवातीला दोनवेळा शून्यावर बाद झाल्यानंतर त्याने शानदार पुनरागमन करत नाबाद अर्धशतक झळकावले होते. हा फॉर्म त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरगुती मालिकेतही कायम ठेवला, जिथे त्याने दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावले. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळतानाही त्याने एक शतक आणि एक अर्धशतक ठोकत आपली लय कायम राखली आहे.
दिल्लीचा संघ गुणतालिकेत अव्वल –
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी विराट दिल्लीसाठी आणखी एक सामना खेळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक सरनदीप सिंह यांनी हे वृत्त फेटाळून लावले असून विराट आता भारतीय संघासाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे, ऋषभ पंत आणि हर्षित राणा हे खेळाडू अलूर येथील सामन्यासाठी निवडीसाठी उपलब्ध असतील. दिल्लीचा संघ सध्या पाच सामन्यांत चार विजयांसह ग्रुप ‘डी’ मध्ये अव्वल स्थानी आहे. आगामी रेल्वेविरुद्धचा सामना जिंकून आपली पकड अधिक मजबूत करण्याचा दिल्लीचा प्रयत्न असेल.





