Shreyas Iyer Fitness : न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा दिलासा; श्रेयस अय्यरला मिळाला ‘ग्रीन सिग्नल’

Shreyas Iyer fitness update for New Zealand series : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर याने दुखापतीतून सावरून पूर्ण फिटनेस मिळवला असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ने (CoE) त्याला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी तो निवडीसाठी उपलब्ध असणार आहे.
मैदानात परतताच ८२ धावांची तुफानी खेळी –
विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईचे नेतृत्व करताना श्रेयस अय्यरने आपल्या फिटनेसचा पुरावा दिला. हिमाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने केवळ ५३ चेंडूत ८२ धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळीत त्याने १० चौकार आणि ३ उत्तुंग षटकार लगावले. श्रेयसच्या या शानदार कामगिरीमुळे मुंबईने हिमाचल प्रदेशवर ७ धावांनी मात करत ‘ग्रुप-सी’मधून उपांत्यपूर्व फेरीत (Quarterfinals) प्रवेश केला आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर झाली होती दुखापत –
नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील एका वनडे सामन्यात झेल घेताना श्रेयसच्या ‘स्प्लीन’ला (बरगडी) गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला रुग्णालयातही दाखल करावे लागले होते. या गंभीर दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरगुती मालिकेबाहेर होता. मात्र, दीर्घकाळ विश्रांती आणि उपचारानंतर आता तो पुन्हा मैदानात परतला आहे. आता तो न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत उपकर्णधार म्हणून मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे.
हेही वाचा – IND vs SA : भारतीय युवा ब्रिगेडचा दक्षिण आफ्रिकेला ‘क्लीन स्वीप’; वैभव सूर्यवंशीची कप्तानी खेळी
न्यूझीलंड मालिकेसाठी भारताचे वेळापत्रक –
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ सामन्यांची वनडे मालिका ११ जानेवारीपासून सुरू होणार आहे:
- पहिला सामना: ११ जानेवारी (वडोदरा)
- दुसरा सामना: १४ जानेवारी (राजकोट)
- तिसरा सामना: १८ जानेवारी (इंदूर)
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ:
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंह, यशस्वी जौस्वाल.





