ICC ODI Ranking : आयसीसीच्या वनडे क्रमवारीमुळे उडाली खळबळ! विराट-रोहितचे नाव गायब झाल्याने चर्चेला उधाण

Virat Kohli and Rohit Sharma name missing in ICC ODI Ranking : भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना आयसीसीच्या ताज्या वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत मोठा धक्का बसला आहे. 20 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर झालेल्या क्रमवारीत हे दोन्ही खेळाडू टॉप-100 मधूनही बाहेर पडले आहेत. अवघ्या एका आठवड्यापूर्वी रोहित शर्मा जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर तर विराट कोहली चौथ्या स्थानावर होता. या अचानक बदलामुळे जगभरातील चाहते हैराण झाले आहेत.
बाबर दुसऱ्या स्थानी, विराट-रोहित गायब –
आयसीसीच्या ताज्या वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत शुबमन गिल पहिल्या स्थानावर असून बाबर आझम (729 रेटिंग) दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र, या यादीच्या प्रकाशनानंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. कारण, आठवड्यापूर्वी म्हणजे १३ ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या क्रमवारीत दुसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असलेले रोहित-विरुटी अचानक यादीतून गायब झाले आहेत.
चाहतेही झाले चकीत –
Where is Rohit Sharma and Virat Kohli ?🧐
– Technical Glitch or Something 🤔 pic.twitter.com/zTPiu3wl9s
— Richard Kettleborough (@RichKettle07) August 20, 2025
यामुळे चाहत्यांकडून प्रश्न उपस्थित होत आहेत की, हे फलंदाज टॉप-100 मधून कसे गायब होऊ शकतात? यादीतील हा बदल सिस्टीममधील तांत्रिक त्रुटीमुळे झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, कसोटी आणि टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतलेले विराट कोहली आणि रोहित शर्मा वनडे फॉरमॅटमध्ये अद्याप सक्रिय आहेत.त्यामुळे त्यांचे नाव टॉप-100 मधून गायब होणे ही आयसीसीच्या क्रमवारीतील त्रुटी मानली जात आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोघांनीही केली होती दमदार कामगिरी –
यंदा झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा भारतीय संघाकडून खेळले होते. या स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर हे दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये व्यस्त झाले. आयपीएलनंतर भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली, तर बांगलादेशविरुद्धची मर्यादित षटकांची मालिका रद्द झाली. यामुळे विराट आणि रोहित गेल्या काही काळापासून वनडे सामन्यांपासून दूर आहेत.
हेही वाचा – Women’s World Cup 2025 : वनडे वर्ल्डकप 2025 साठी भारतीय महिला संघ जाहीर
आशिया कपनंतर पुनरागमनाची शक्यता –
तरीही, यंदा होणाऱ्या आशिया कपनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट कोहली आणि रोहित शर्मा मैदानावर परततील, अशी अपेक्षा आहे. टेस्ट आणि टी-20 मधून निवृत्ती घेतल्यानंतर आता या दोन्ही दिग्गज खेळाडूंसाठी केवळ वनडे हा एकमेव फॉरमॅट शिल्लक आहे, ज्यामध्ये ते खेळताना दिसतील. आयसीसीच्या क्रमवारीतील या त्रुटीमुळे चाहत्यांमध्ये नाराजी पसरली असली, तरी या दोन्ही खेळाडूंच्या पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





