Women’s World Cup 2025 : वनडे वर्ल्डकप 2025 साठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 30 सप्टेंबरपासून भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 साठी 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. 12 वर्षांनंतर भारतात आयोजित होणाऱ्या या स्पर्धेत हरमनप्रीत कौर भारतीय संघाचे नेतृत्व करेल, तर स्मृती मानधना उपकर्णधारपदी कायम आहे. नीतू डेव्हिड यांच्या अध्यक्षतेखालील महिला निवड समितीने पत्रकार परिषदेत या संघाची घोषणा केली.
8 संघांचा सहभाग
2013 नंतर प्रथमच भारतात होणाऱ्या या विश्वचषकात 8 संघ सहभागी होतील. 2013 मध्ये भारत गट टप्प्यातच बाहेर पडला होता, पण यंदा भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. भारत-पाकिस्तान सामने श्रीलंकेत खेळवले जातील, तर उर्वरित सामने भारतात होणार आहेत.
शफाली वर्माला डच्चू
भारतीय संघात स्मृती मानधना,प्रतीका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांसारख्या स्टार खेळाडूंचा समावेश आहे. यष्टीरक्षक म्हणून ऋचा घोष आणि यस्तिका भाटिया यांना स्थान मिळाले आहे. गोलंदाजीमध्ये रेणुका सिंह, अरुंधती रेड्डी, अमनजोत कौर आणि राधा यादव यांचा समावेश आहे, तर दीप्ती शर्मा, स्नेह राणा आणि क्रांती गौड यांसारख्या अष्टपैलूंनी संघाला संतुलन आले आहे. मात्र, स्फोटक सलामीवीर शफाली वर्माला संघात स्थान मिळालेले नाही. अलीकडील खराब फॉर्ममुळे तिला भारतीय ‘अ’ संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाठवण्यात आले आहे.
महिला विश्वचषक 2025 साठी भारतीय संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रतीका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रेणुका सिंह ठाकूर, अरुंधती रेड्डी, ऋचा घोष (यष्टीरक्षक), क्रांती गौड, अमनजोत कौर, राधा यादव, श्री चरणी, यस्तिका भाटिया (यष्टीरक्षक), स्नेह राणा.
भारताचे वेळापत्रक
– 30 सप्टेंबर 2025: भारत वि. श्रीलंका
– 5 ऑक्टोबर 2025: भारत वि. पाकिस्तान
– 9 ऑक्टोबर 2025: भारत वि. ऑस्ट्रेलिया
– 19 ऑक्टोबर 2025: भारत वि. इंग्लंड
– 23 ऑक्टोबर 2025: भारत वि. न्यूझीलंड
– 26 ऑक्टोबर 2025: भारत वि. बांगलादेश





