विनोदवीर सागर कारंडे ‘चला हवा येऊ द्या’मधून बाहेर; ‘पोस्टमन काका’ची जागा घेतली ‘या’ कलाकाराने

मुंबई – संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारा एपिसोड ‘चला हवा येऊ द्या’मधून विनोदवीर सागर करांडे यांनी एक्झिट घेतली आहे. ते आता कार्यक्रमात दिसणार नाहीत. त्यांची पोस्टमन काकाची जागा श्रेया बुगडे यांनी घेतली आहे. सध्या त्या पत्र वाचण्याचे काम करताना पाहायला मिळत आहे.
सागर कारंडे यांच्या हास्यकलेने प्रेक्षकांना एकाचवेळी हसवले आणि रडवले आहे. त्यांचे खुप चाहते आहेत. कारंडे आता या कार्यक्रमात दिसणार नसल्याने चाहते नाराज झाले आहेत. अरविंद जगताप यांनी लिहिलेली पत्रे सागर कारंडेने आपल्या भावनिक शैलीत सादर केले आहेत. त्यामुळे हास्याच्या मंचावर प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणण्याचं काम सागरने केले आहे.
दरम्यान, झी मराठीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पोस्टमन काकांची जागा श्रेया बुगडे यांनी घेतलेली दिसत आहे. या व्हिडीओमध्ये पत्राच्या रुपात कविता वाचताना श्रेया बुगडे दिसत आहे. श्रेयाने खास पोस्टमनचा लुकदेखील केला आहे. त्यामुळे आता कारंडे यांची या कार्यक्रमातून एक्झिट झाल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळत आहे.
View this post on Instagram
सागर कारंडेंच्या या एक्झिटमुळे त्याचे चाहते नाराज झाले आहेत. श्रेया बुगडेच्या व्हिडीओवर सागरच्या चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. नेटकऱ्यांनी विविध प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. सागर कारंडे वाचत असलेले पत्र मनाला भिडायचे, सागर कारंडे कुठे आहेस?, चला हवा येऊ द्या का सोडलं सागर कारंडेने?, श्रेया तुझ्या आवाजात सागरसारखा गंभीरपणा नाही, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहे.
श्रेया बुगडे ही देखील या कार्यक्रमातील एक उत्तम अभिनेत्री आहे, मात्र चाहत्यांना सागर कारंडेची सवय झाल्याने कारंडे यांच्याप्रमाणे श्रेयाला हा अभिनय जमत नसल्याचे नेटकरी म्हणत आहेत.
सागर कारंडे हा ‘फू बाई फू’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचला. त्याची आणि भारत गणेशपुरेची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर ‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून त्याने वेगवेगळ्या विनोदी भूमिका सादर करत प्रेक्षकांचं मन जिंकले. सागर कारंडे आता पुढे कोणत्या भूमिकेत आणि कोणत्या प्लॅटफाॅर्मवर दिसेल हे आता पाहावे लागणार आहे.





