मराठी अभिनेते सागर कारंडे यांच्या ‘पोस्टमन’ भूमिकेचा गौरव; टपाल तिकीट प्रकाशित!

पुणे : भारत सरकारच्या ‘माय स्टॅम्प’ (My Stamp) या विशेष योजनेअंतर्गत, सुप्रसिद्ध मराठी लेखक आणि अभिनेते सागर कारंडे यांच्या ‘पोस्टमन’ भूमिकेचा आगळावेगळा गौरव करण्यात आला आहे. भारतीय डाक दिवस तसेच लोकप्रिय मालिका ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये त्यांनी साकारलेल्या ‘पोस्टमन’ या हृदयस्पर्शी भूमिकेसाठी, त्यांचे टपाल तिकीट तयार करून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. पुणे सिटी पोस्टच्या सहकार्याने ही अनोखी भेट सादर करण्यात आली आहे.
महान व्यक्ती किंवा महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचे फोटो टपाल तिकीटावर छापण्याची भारत सरकारची जुनी योजना आहे. याच योजनेनुसार, सागर कारंडे यांनी ‘चला हवा येऊ द्या’ या मालिकेत सातत्याने पोस्टमनच्या व्यक्तिरेखेत पत्रवाचन केले. या पत्रवाचनातून त्यांनी अनेक भावना प्रेक्षकांसमोर मांडल्या आणि आजच्या आधुनिक युगातही पोस्टमन या व्यक्तीचे असलेले अनमोल महत्त्व सिद्ध केले.
ईमेल, व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम अशा अनेक सोशल मीडिया माध्यमांच्या काळातही, जिथे ही आधुनिक माध्यमे पोहोचू शकत नाहीत, तिथे पोस्टमन ही व्यक्ती पोहोचू शकते, हे त्यांनी आपल्या भूमिकेतून प्रभावीपणे दाखवले. त्यांच्या या उत्तुंग भूमिकेमुळे ‘पोस्टमन’ या व्यक्तीची व्याख्याच बदलून गेली, असे गौरवद्गार यावेळी काढण्यात आले.
कारंडे यांच्या या योगदानाचा सन्मान म्हणून, पुणे सिटी पोस्टच्या भारत सरकारच्या टपाल तिकीट योजनेनुसार त्यांचे टपाल तिकीट तयार करण्यात आले. सदर टपाल तिकीट हे पुण्याचे सिटी पोस्ट या मुख्य पोस्ट ऑफिसच्या सहकार्याने, ‘माय स्टॅम्प’ (My Stamp) या वैयक्तिक टपाल तिकीट योजनेवर आधारित आहे. विशेष म्हणजे, इतर टपाल तिकीटांप्रमाणेच हे टपाल तिकीट देशात कोठेही वापरून पत्र पाठविण्यासाठी ग्राह्य (वैध) असणार आहे.
यावेळी समीर धर्माधिकारी, पुणे सिटी पोस्ट मुख्य कार्यालयाचे उप पोस्ट मास्टर संदीप ढवळे आणि त्यांचे सहकारी अभिमन्यू क्षीरसागर हे उपस्थित होते. एका कलाकाराच्या भूमिकेचा टपाल तिकीटाच्या माध्यमातून झालेला हा सन्मान मराठी कलाक्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरला आहे.




