Vinesh Phogat Loss : सुप्रीम कोर्टात जिंकली पण मॅटवर हरली! उपांत्य फेरीतील पराभवानंतर विनेश फोगाटचं आशियाई खेळांचं स्वप्न भंगलं
Vinesh Phogat Loss : निवड चाचणीच्या उपांत्य फेरीत मीनाक्षी गोयतकडून ६-४ ने पराभूत झाल्यामुळे विनेश फोगाटचे २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगले.

Vinesh Phogat Loss Asian Games Trials 2026 : भारताची अनुभवी आणि स्टार महिला पैलवान विनेश फोगाटचे आगामी ‘आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६’ मध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न चक्काचूर झाले आहे. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवर आयोजित निवड चाचणीत ५३ किलो वजनी गटात उतरलेल्या विनेशला सेमीफायनलमध्ये पराभवाचा धक्का सहन करावा लागला. एका अत्यंत चुरशीच्या सामन्यात युवा पैलवान मीनाक्षी गोयतने विनेशचा ६-४ अशा गुणांच्या फरकाने पराभव करत फायनलचे तिकीट पक्के केले. या पराभवासोबतच विनेशचे आशियाई खेळांमधील आव्हान संपुष्टात आले आहे.
कोर्टाच्या निर्णयानंतर पुनरागमनाकडे लागल्या होत्या नजरा!
ही निवड चाचणी सुरू होण्यापूर्वीच विनेश फोगाटच्या पुनरागमनाची जोरदार चर्चा क्रीडा वर्तुळात होती. सुप्रीम कोर्ट आणि दिल्ली हायकोर्टाकडून कायदेशीर दिलासा मिळाल्यानंतरच तिला या निवड प्रक्रियेत भाग घेण्याची परवानगी मिळाली होती. त्यामुळे प्रदीर्घ काळानंतर मॅटवर परतणाऱ्या विनेशकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. चाचणीच्या पहिल्या फेरीत विनेशने हरियाणाच्या ज्योतीचा ७-१ असा सहज पराभव करत शानदार सुरुवात केली.
#WATCH | दिल्ली: रेस्लर विनेश फोगट एशियन गेम्स सिलेक्शन ट्रायल्स के सेमीफाइनल में हरियाणा की मीनाक्षी के खिलाफ अपना तीसरा मुकाबला 4-6 से हार गईं। pic.twitter.com/uWsFrdkyMO
— ANI_HindiNews (@AHindinews) May 30, 2026
त्यानंतरच्या पुढील अटीतटीच्या सामन्यात तिने निशूविरुद्ध संघर्षपूर्ण विजय मिळवला. हा सामना ६-६ असा बरोबरीत सुटला होता, परंतु तांत्रिक निकषांच्या आधारे विनेशला विजेते घोषित करण्यात आले. या निर्णयावरून मोठा वादही झाला; निशूच्या प्रशिक्षकांनी रेफरीच्या निर्णयाला आव्हान दिले, पण त्यांची अपील फेटाळण्यात आली.
स्टेडियममधील राडा आणि वजनाचा गोंधळ!
#VineshPhogat goes down 4-6 to Meenakshi in the semifinals of trials for #AsianGames pic.twitter.com/amQ96Schgr
— Uthra 🇮🇳 (@OnTheSportField) May 30, 2026
स्पर्धेच्या दिवशी स्टेडियममध्ये प्रवेश करण्यावरूनही काही काळ नाट्यमय परिस्थिती निर्माण झाली होती. विनेश आणि तिचा पती सोमवीर राठी यांच्या एंट्रीवरून सुरक्षा रक्षकांसोबत जोरदार वाद झाला, मात्र नंतर हा वाद मिटवण्यात आला. यानंतर वजन मोजण्याच्या प्रक्रियेतही मोठा गोंधळ उडाला. सुरुवातीला विनेशचे नाव ५० किलो वजनी गटात नोंदवले गेले होते, ज्यावर तिने तीव्र आक्षेप घेतला. अखेर भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) हस्तक्षेपानंतर तिचे नाव ५३ किलो वजनी गटात समाविष्ट करण्यात आले आणि तिला खेळण्याची परवानगी मिळाली.
महासंघाचा विरोध डावलून मिळाली होती एंट्री!
निवड चाचणीच्या अवघ्या काही तास आधी भारतीय कुस्ती महासंघाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून विनेशच्या सहभागावर बंदी घालण्याची मागणी केली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने महासंघाची ही याचिका फेटाळून लावत विनेशचा मार्ग मोकळा केला होता. मात्र, कोर्टाच्या या मोठ्या दिलास्यानंतरही विनेशला मैदानात यश मिळवता आले नाही आणि सेमीफायनलमधील पराभवामुळे तिची आशियाई खेळांची संधी हुकली.





