Vinesh Phogat Relief : विनेश फोगाटला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा! आशियाई क्रीडा स्पर्धा चाचणीत खेळणार; WFI ची याचिका फेटाळली
Vinesh Phogat Relief : सर्वोच्च न्यायालयाने कुस्तीपटू विनेश फोगाटला २०२६ च्या आशियाई खेळांसाठीच्या निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्यास परवानगी दिली आहे. भारतीय कुस्ती महासंघाने दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.

Vinesh Phogat Relief by Supreme Court : देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने स्टार महिला पैलवान विनेश फोगाटच्या (Vinesh Phogat) बाजूने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने विनेशला आगामी ‘आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६’ च्या (Asian Games 2026) निवड चाचणीत (सिलेक्शन ट्रायल्स) सहभागी होण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात दिल्ली हायकोर्टाचा आधीचा आदेश कायम ठेवला असून, या निर्णयाला आव्हान देणारी भारतीय कुस्ती महासंघाची (WFI) विशेष अनुमती याचिका फेटाळून लावली आहे.
“देश सर्वात आधी हे विसरू नका!”; कोर्टाकडून कौतुक आणि सल्ला
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा यांच्या खंडपीठाने विनेश फोगाटच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचे आणि देशासाठी दिलेल्या योगदानाचे तोंडभरून कौतुक केले. कोर्टाने तोंडी टिप्पणी करताना सांगितले की, विनेशने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची मान उंचावली असून तिची एक उत्कृष्ट अॅथलीट म्हणून मोठी ओळख आहे. मात्र, त्याच वेळी न्यायालयाने खेळाडूंना शिस्तीचा धडाही दिला. कोर्टाने स्पष्ट शब्दांत म्हटले की, “तुम्ही एक उत्तम खेळाडू आहात यात शंका नाही, पण कोणत्याही अॅथलीटसाठी देशाची प्रतिष्ठा आणि खेळाचे नियम सर्वात आधी आले पाहिजेत, हे नेहमी लक्षात ठेवा.”
खेळात न्यायालयाच्या हस्तक्षेपावर सुप्रीम कोर्टाची कडक टिप्पणी!
BIG RELIEF FOR VINESH PHOGAT 🇮🇳🤼♀️
The Supreme Court has cleared Vinesh Phogat to participate in the Asian Games selection trials scheduled for May 30.
The decision keeps the Olympic medallist’s hopes alive as she looks to earn her place in India’s squad for the continental… pic.twitter.com/wUPvW84GwA
— IndiaSportsHub (@IndiaSportsHub) May 29, 2026
विनेशला या वेळी विशेष सवलत म्हणून दिलासा दिला असला, तरी खेळ संघांच्या अंतर्गत आणि तांत्रिक बाबींमध्ये न्यायालयांच्या वाढत्या हस्तक्षेपावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र चिंता आणि नाराजी व्यक्त केली. न्यायमूर्ती नरसिम्हा अत्यंत कडक भाषेत म्हणाले की, “क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक आणि खेळाडूंची निवड प्रक्रिया यांसारख्या तांत्रिक बाबींमध्ये कोर्टाने इतक्या सहजतेने हस्तक्षेप करू नये. हे काही एखाद्या मेडिकल कॉलेजच्या अॅडमिशनचे प्रकरण नाही, तर हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळ आहेत. न्यायालयांच्या अशा हस्तक्षेपामुळे खेळांचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडू शकते.” भविष्यात अशा तांत्रिक विषयात महासंघाच्या अधिकारांना प्राधान्य दिले जावे, असे संकेतही कोर्टाने दिले.
हेही वाचा – Smart Sunglasses Ban : आयपीएलच्या क्लालिफायर-२ सामन्यापूर्वी बीसीसीआयचा मोठा निर्णय! ‘या’ गोष्टीवर घातली बंदी
काय होते मूळ प्रकरण?
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या निवड चाचणीचे वेळापत्रक आणि नियम यावरून विनेश फोगाट आणि भारतीय कुस्ती महासंघ (WFI) यांच्यात मोठे मतभेद निर्माण झाले होते. महासंघाच्या नियमांना आव्हान देत विनेशने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती, जिथे हायकोर्टाने तिच्या बाजूने निकाल दिला होता. याविरोधात कुस्ती महासंघाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, विनेशचे जुने रेकॉर्ड्स आणि तिची क्षमता लक्षात घेऊन सुप्रीम कोर्टाने तिला या चाचणीत उतरण्याची परवानगी दिली असून आता तिच्याकडे आशियाई खेळांचे तिकीट मिळवण्याची सुवर्णसंधी असेल.





