Vimal Pan Masala Seized : ‘एफडीए’ची मोठी कारवाई! खेड शिवापूर नाक्यावर १.०७ कोटींचा ‘विमल’ साठा जप्त
Vimal Pan Masala Seized : आयशर ट्रकमधून केली जात होती विमल पानमसाल्याची तस्करी; खेड शिवापूर टोल नाक्यावर संशयावरून तपासणी केली असता गुपित उघड.

Vimal Pan Masala Seized – पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर (ता. भोर) टोल नाक्यावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) गुरुवारी (दि. ११) सकाळी मोठी कारवाई केली. महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला विमल पानमसाला आणि सुगंधी तंबाखूचा तब्बल १ कोटी ७ लाख ५२ हजार रुपयांचा साठा या कारवाईत जप्त करण्यात आला.
अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (दि. ९) सकाळी ७ वाजेच्या सुमारास आयशर प्रो (आरजे १९ जीजे २०६१) हे वाहन टोल नाक्यावर आले असता, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी संशयावरून ते थांबवले. वाहनाची तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात विमल पानमसाला आणि ‘व्ही-१’ तंबाखूचा साठा ठेवल्याचे उघड झाले.
या कारवाईत ७७ लाख ४४ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पानमसाला आणि ३० लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण १ कोटी ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राजेंद्र सासणे, सुजीत खिवसरा आणि वाहन मालक नंदकिशोर रुपाराम यांच्यावर ‘अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६’ तसेच भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखू व पानमसाल्यावर बंदी घातली असतानाही मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या वाहतुकीमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य पुरवठादार आणि उत्पादकांचा शोध घेण्यासाठी तपास चक्रे फिरवण्यात येत आहेत. पोलीस उपनिरीक्षक पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.





