पुणे जिल्हा | सारोळा-वीर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांचा रास्तारोको

कापूरहोळ, (वार्ताहर) – भोर तालुक्यातील सारोळा-भोंगवली ते म्हाऊर खिंड या रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनचालकांना प्रचंड अडचणी येत आहेत.
स्थानिक ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर, भोंगवली फाटा येथे प्रहार जनशक्ती पक्ष भोर व स्थानिक सरपंच व ग्रामस्थांच्या वतीने सोमवारी, दि. १२ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या वेळी मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी झाले होते. आक्रमक नागरिकांनी रस्ता रोखून धरल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभाग भोर उपअभियंता शिवानंद हल्लाळे यांनी आंदोलनकर्त्यांना सारोळा-भोंगवली ते वीर रस्त्याचे खड्डे भरून देणार असल्याबाबतचे पत्र देऊन आंदोलन थांबवण्याची विनंती केली.
दिलेल्या पत्रामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सांगण्यात आले की, जुलै ते ऑगस्टपर्यंत प्रचंड प्रमाणात पाऊस असल्याने या रस्त्यावरचे खड्डे भरता येणे शक्य झाले नाही.
सध्याच्या स्थितीला पावसाचा जोर कमी झाल्याने रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम त्वरित हाती घेण्यात आले असून या रस्त्यावर दोन्ही साईड पट्टीची झाडे तोडून दिशादर्शक फलक लावून देणार आहे.
या सर्व रस्त्याच्या दरम्यानचे बॅड पॅचेस हे पावसाळा संपताच डांबरी पृष्ठभागाने भरून घेण्यात येणार असल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे. यावेळी राजगड पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या आंदोलनावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष अजय कांबळे, राजापूर गावचे सरपंच बाळासाहेब बोबडे, न्हावी ३१५ गावचे सरपंच भरत सोनवणे, भोंगवली गावचे सरपंच अरुण पवार,
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक भालचंद्र जगताप, राजेंद्र सोनवणे, धनंजय जगताप, सत्यजित जगताप, सचिन निगडे, निलेश बाठे, मिलिंद तारु, संग्राम भोसले, निलेश भांडे, सागर बोबडे, गणेश निगडे, माधवी सोनवणे, संदीप सोनवणे, जगन्नाथ सपकाळ, निलेश सोनवणे, सचिन चव्हाण, विजूभाऊ चव्हाण तसेच मोठ्या प्रमाणावर पूर्व भागातील नागरिक उपस्थित होते.





