Unseasonal Rain – गेल्या तीन-चार दिवसांपासून जाणवणाऱ्या प्रचंड उकाड्यानंतर, बुधवारी (दि. १८) सायंकाळी ४ च्या सुमारास कापूरहोळ, नसरापूर, किकवी आणि सारोळा पंचक्रोशीत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह सुमारे अर्धा तास गारांचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. अचानक आलेल्या या पावसामुळे काढणीला आलेल्या गहू, ज्वारी आणि बाजरी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कांदा आणि कडधान्यांच्या पिकांनाही या अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. कामथडी, कासुरडी आणि सारोळा परिसरात सध्या गहू आणि कांदा काढणीची कामे प्रगतीपथावर होती. मात्र, पावसामुळे शेतात साठवून ठेवलेले कांद्याचे ढिगारे भिजल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. पावसासोबतच सोसाट्याचा वारा असल्याने काही ठिकाणी विजेचे खांब कोलमडले, तर काही ठिकाणी तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणचे कर्मचारी भरपावसातही वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करताना दिसून आले. उन्हाच्या तडाख्यानंतर आलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला, तरी शेतकरी मात्र चिंतेत सापडला आहे.