Jayakumar Gore : कामे करण्यासाठी पैसे मागाल तर ग्रामविकास मंत्र्यांचा कारवाईचा इशारा; पुण्यातील आढावा बैठकीनंतर माध्यमांशी संवाद

पुणेः पुणे विभागाच्या ग्रामविकास विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळा आणि आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. नागरिकांची कामे करून घेण्यासाठी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी पैशांची मागणी केल्यास त्यांच्यावर अॅक्शन घेऊन कारवाई करण्याचा इशारा दिला.
तसेच भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी कार्यालयाबाहेर माझा मोबाईल क्रमांक लिहिण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. ज्यांना घरे नाहीत आणि जमिनी नाहीत अशा नागरिकांसाठी घरकुल योजना राबविली जात आहे. घरकूल योजना मंजूर करण्यासाठी, घरकूलचा हप्ता देण्यासाठी कर्मचारी, अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे पैसे देण्याची गरज नाही. त्यातही कोणी कर्मचारी पैसे मागत असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
कर्मचारी अधिकारी यांची सेवा, आस्थापनाविषयक आणि नागरिकांची कामे जिल्हा परिषदेच्या पातळीवर होणार असतील तर त्यासाठी अनेकजण मंत्रालयात जातात. त्यांनी त्या कामांसाठी मंत्रालयात जाऊ नये, त्यांची कामे जिल्हा पातळीवरच पूर्ण करावीत, अशा सूचना देखील त्यांनी यावेळी बोलताना केल्या आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषदेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती पेन्शन मिळण्यात कोणतीही अडचण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
सरपंचासोबत ग्रामसेवकावरही कारवाई
राज्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये कामे करुन घेण्यासाठी भष्ट्रचार होत असून याबाबतच्या अनेक तक्रारी येतात. त्या तक्रारीवरून सरपंचावर कारवाई केली जाते. मात्र, सरपंचासोबत ग्रामसेवकही दोषी असतो. कारण ते दोघेही मिळून स्वाक्षरी करत असतात. यामुळे सरपंचासोबतच ग्रामसेवकावरही कारवाई केली जाणार असल्याचा इशारा गोरे यांनी दिला.





