Pune District : विकास चव्हाण यांना ‘आदर्श शेतकरी’ पुरस्कार
Pune District : कृषी क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

बेल्हे :पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे यांच्या वतीने स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर) येथील प्रगतशील शेतकरी तसेच श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक विकास हरिभाऊ चव्हाण यांना सत्पत्नीक ‘आदर्श शेतकरी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कृषी क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमात ‘अजित पवार कृषी समृद्धी कर्ज योजना’, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारित कृषी उपक्रमांचा शुभारंभ तसेच जिल्ह्यातील आदर्श शेतकर्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या एका शेतकर्याची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. जुन्नर तालुक्यात आधुनिक ऊस शेतीचे मार्गदर्शक म्हणून ओळख असलेल्या विकास चव्हाण यांनी एकरी 100 टनांपेक्षा अधिक ऊस उत्पादनाचा आदर्श निर्माण केला आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार, शेतकर्यांना मार्गदर्शन आणि ऊस उत्पादन वाढीसाठी केलेल्या कार्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. हा पुरस्कार उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील तसेच माजी विधानसभा अध्यक्ष व आमदार दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
ऊस शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार
विकास चव्हाण यांनी महाराष्ट्रभर आयोजित शेतकरी मेळावे, चर्चासत्रे आणि शेतीशाळांमधून आधुनिक ऊस उत्पादन तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘ऊस खोडवा पाचट व्यवस्थापन चळवळी’मुळे पाचट न जाळता ते जागेवरच कुजवून सेंद्रिय खत तयार करण्याची संकल्पना अनेक शेतकर्यांनी स्वीकारली आहे. या उपक्रमामुळे जमिनीची सुपीकता वाढण्याबरोबरच पर्यावरण संवर्धन आणि पाण्याच्या बचतीलाही चालना मिळाली आहे.
‘सुपर केन नर्सरी’ संकल्पनेला राज्यभर प्रतिसाद
कमी खर्चात आणि कमी पाण्यात दर्जेदार ऊस रोपे शेतकर्यांना स्वतःच्या शेतात तयार करता यावीत, यासाठी विकास चव्हाण यांनी ‘सुपर केन नर्सरी’ ही अभिनव संकल्पना विकसित केली. श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून या संकल्पनेची चळवळ उभी राहिली असून, आज ती महाराष्ट्रासह इतर राज्यांतील शेतकर्यांपर्यंतही पोहोचली आहे.





