पिंपरी | पोलीस आयुक्तालयात विधानसभा कक्ष कार्यान्वित

पिंपरी, (प्रतिनिधी) – केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि. १५) पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात स्वतंत्र विधानसभा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईबाबत आयुक्तालयाकडून माहिती संकलित केली जात आहे.
महाराष्ट्र विधानसभेकरिता आदर्श आचारसंहिता लागू झाली असून २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.
निवडणुक आचारसंहितेच्या या काळात दिवाळी, छटपूजा, गुरूनानक जयंतीसह विविध जाती धर्माचे सणही साजरे होणार आहेत.
इच्छुकांनी निवडणुकीची जोरदार तयारी पूर्वीपासूनच केली आहे. अशावेळी मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून विविध उपक्रम राबविले जातील.
तर काही जणांकडून शक्ती प्रदर्शनही केले जाण्याची शक्यता आहे. या कालावधीत शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून दक्षता घेतली जात आहे.
त्यासाठीच पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशान्वये पोलीस आयुक्तालयात स्वतंत्र विधानसभा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षांतर्गत निवडणुकीशी संबंधित कामकाजांना प्राधान्य दिले जाणार आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत, पिंपरी, चिंचवड, भोसरी हे प्रमुख विधानसभा मतदार संघ असून मावळ, खेड, भोर आणि वडगाव शेरी यांचा या मतदार संघाचा काही भाग येतो.
या सात मतदार संघामध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा, बैठका होतील. त्यासाठी महत्वाचे, अतिमहत्वाचे बंदोबस्त तैनात करावा लागणार आहे. त्या अनुषंगाने या स्वतंत्र कक्षामार्फत नियोजन केले जाणार आहे.
प्रतिबंधात्मक कारवाईला सुरूवात
पोलीस आयुक्तालयाकडून शहरातील सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित केली जात आहे. दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी यापूर्वीच मोका, तडीपार, एमपीडीए यासारखी प्रतिबंधात्मक कारवाई करीत अनेकांना कारागृहात स्थानबद्ध केले आहे. असे असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी काही गुंडांवर कारवाईची शक्यता आहे.
सोशल मिडियावरही राहणार लक्ष
विधानसभा निवडणुकीसाठी बहुतांश उमेदवारांनी यापूर्वीच प्रचाराला सुरूवात केली आहे. त्यापैकी काही जणांनी सोशल मिडियावरील प्रचाराकरिता वॉर रूम सुरू केली आहे. विद्यमान आमदारांनी कोणती जनहिताची कामे केली नाहीत, यावर विरोधकांकडून बोट ठेवले आहे.
तर काहीजण जाती, धर्माचा आधार घेत मतदारांना साद घालत आहेत. यातून कोणताही धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण होणार नाही, याकडे निवडणूक आयोगासह पोलिसांचेही लक्ष राहणार आहे.





