पुणे | सव्वा लाख मतदारांचे सोसायट्यांत मतदान

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जिल्ह्यातील २१ विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार संख्या निश्चित झाली आहे. यामध्ये ८६ लाख ४७ हजार १७२ मतदार असून, प्रारूप मतदार यादीपेक्षा वाढलेल्या मतदारांमुळे जिल्ह्यात ८ हजार ४६२ मतदान केंद्रांमध्ये मतदान होणार आहे.
त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यात ६७ गृहनिर्माण संस्थांमध्ये तब्बल १२६ मतदान केंद्रे तयार करण्यात येणार आहेत. या गृहनिर्माण संस्थांमधील मतदान केंद्रांवर तब्बल १ लाख ३६ हजार १०३ मतदार मतदान करणार आहेत.
शहरी मतदारांचा मतदानासाठी प्रतिसाद वाढवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठ्या सोसायट्या, तसेच सोसायट्यांच्या आवारातच मतदान केंद्र उभारण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार लोकसभा निवडणुकीत हा प्रयोग राबविण्यात आला. त्या वेळी जिल्ह्यातील ३५ गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे उभारण्यात आली होती.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पुण्यातील शहरी मतदारांच्या मतदानाप्रती असलेल्या अनास्थेविषयी चिंता व्यक्त केली होती. त्यानुसार यंदा मतदानाचा वार बुधवार असणार आहे. त्यामुळे मतदारांना जोडून सुट्या नसतील. परिणामी मतदानाचा टक्का वाढेल, अशी अपेक्षा आहे.
त्यासाठीच जिल्हा निवडणूक यंत्रणेनेदेखील गृहनिर्माण संस्थांमधील मतदारांसाठी शहरी मतदारसंघांत विशेषत: कोथरूड, हडपसर, खडकवासला, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट, चिंचवड, पिंपरी यांसारख्या मतदारसंघामधील मोठ्या अर्थात १५०० पेक्षा अधिक मतदारसंख्या असलेल्या गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे शहर
मतदारसंघ- गृहनिर्माण संस्था- मतदान केंद्र- एकूण मतदार
१) वडगावशेरी २-६-५६७२
२) शिवाजीनगर ४-५-४६९२
३) कोथरूड १५-३१-३३२९७
४) खडकवासला ८-९-६५४०
५) पर्वती १-१-११६९
६) हडपसर ४-३३-४१२३६
७) पुणे कॅन्टोन्मेंट ४-५-५३९६





