Maharashtra Election 2024 : पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवा, निवडणूक आयोगाकडे ‘या’ पक्षानं केली पुन्हा मागणी…

मुंबई – राज्यातील विधानसभेच्या निवडणुका नि:पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह वादग्रस्त व सत्ताधारी पक्षाला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना हटवावे, अशी मागणी काँग्रेसने पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची कारकीर्द संशयास्पद व वादग्रस्त आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावणे, विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करणे यासारखे प्रकार त्यांनी केले असून त्यांच्यावर गुन्हेही दाखल झालेले आहेत. त्यामुळे शुक्ला यांच्यासह वादग्रस्त व सत्ताधारी पक्षाला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना हटवावे, अशी मागणी पक्षाने परत एकदा निवडणूक आयोगाकडे केली आहे.
शुक्ला यांची सेवा समाप्त झाली असतानाही महायुती सरकारने त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. त्या नेहमी सरकारला अनुकूल अशी भूमिका घेऊन मदत करत असतात, असे वादग्रस्त व संशयास्पद अधिकारी निवडणूक काळात नसावेत, अन्यथा निवडणूक नि:पक्ष होणार नाही. अशी भूमिकाही कॉंग्रेसकडून मांडण्यात आली.





