Satara | भाजपने घेतला मतदारसंघनिहाय आढावा

सातारा, (प्रतिनिधी)- आचारसंहिता लागू होताच विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्याकरिता भारतीय जनता पक्षाची जिल्हा कार्यकारणी सक्रिय झाली आहे.
प्रदेश कार्यकारिणीच्या सूचनेनुसार बूथप्रमुख, शक्तीप्रमुख व मंडलप्रमुख यांनी आपापल्या रचना बळकट करून मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींवर भर द्यावयाचा आहे.
अशा सूचना निर्देशित झाल्या आहेत. त्यानुसार प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी दिली.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर काल आचारसंहिता लागू झाली. त्या अनुषंगाने भाजपने तात्काळ विधानसभानिहाय बैठका घ्यायला सुरुवात झाली.
जिल्ह्यात भाजपचे 3000 बुथ असून शक्ती व केंद्रप्रमुख नेमलेले आहेत. महाराष्ट्राचे प्रभारी अश्विनी वैष्णव या घडामोडींचा आढावा घेत आहेत.
मतदारसंघनिहाय झालेल्या बैठकांमध्ये पक्षाच्या स्थानिक पातळीवर संघटनेचा शक्ती, केंद्र, बूथ प्रमुख रचनेचा आढावा घेण्यात येत आहे. पुढील काही दिवसांत प्रत्येकाने करावयाची कामे वाटून देण्यात आली आहेत.
उमेदवार घोषित होण्याची वाट न पाहता तातडीने प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी व मतदारांशी संवाद इत्यादी कार्यक्रम सूचित करण्यात आले आहेत. सरकारी योजनांचा प्रसार, प्रचार आणि संवाद अशा सूचना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.
पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीने भाजपची 120 उमेदवारांची यादी तयार केली आहे. त्यामध्ये कोणाकोणाची वर्णी लागणार हे सुद्धा औत्सुक्याचा विषय आहे. याशिवाय महायुतीने मुंबईत तातडीची बैठक घेऊन भाजपच्या सर्व आमदार व पदाधिकाऱ्यांना तेथे निमंत्रित केले होते.
एकत्रितपणे काम करून सर्व कार्यकर्त्यांनी संरचनेनुसार काम करावयाचे आहे असे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी या बैठकीत स्पष्ट केले आहे.
संवाद यात्रा, परिवर्तन यात्रा याशिवाय मतदारांच्या गाठीभेटी आणि विधानसभा मतदारसंघनिहाय रोजच्या हालचालींची अपडेट ठेवण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या आहेत.
चार मतदारसंघांवर लक्ष केंद्रित
कराड उत्तर, कराड दक्षिण, सातारा व माण या चार विधानसभा मतदारसंघांवर पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे. यंदा पक्षाने इच्छुकांच्या मुलाखती न घेता थेट वरिष्ठ पातळीवर एजन्सी नेमून विधानसभा मतदारसंघनिहाय पक्षनिरीक्षक पाठवले होते.
त्यांच्यासमोर पदाधिकाऱ्यांनी मतदान करून त्या त्या मतदारसंघात तीन संभाव्य उमेदवारांचे पसंती क्रम मागितले होते. या आठ मतदारसंघांतून कोणाला पहिल्या क्रमांकाची पसंती मिळणार आहे हे भाजपच्या यादीवरून स्पष्ट होणार आहे.





