बुधवार पेठेत व्हिडीओ काढून घरापर्यंत पाठलाग! पुण्यात खंडणीसाठी वेगळाच खेळ…

प्रभात वृत्तसेवा
पुणे – बुधवार पेठेत आलेला आयटी अभियंता, मित्राचे व्हिडिओ चित्रीकरण करून रोख पैसे दिल्याची बतावणी करत खंडणी उकळणाऱ्या दोघांना नांदेड सिटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला असून, आयुष राजू चौगुले (वय २२), सदफ पठाण (वय २१, दोघेही, रा. वाकड) अशी त्यांची नावे आहेत.
सीसीटीव्ही फुटेज तपासणीत सत्य समोर
नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या माहितीनुसार, याप्रकरणी किरकिटवाडीतील ३६ वर्षीय अभियंत्याने फिर्याद दिली आहे. १३ जुलै रोजी फिर्यादी मित्रासमवेत बुधवार पेठेतील एका गल्लीत गेला होता. तेथे गाडीवर बसला असता, आरोपींनी त्यांचा एक व्हिडिओ शूट केला. फिर्यादी परत येताना आरोपींनी त्यांचा घरापर्यंत पाठलाग केला.
घराजवळ तुम्ही बुधवार पेठेत आला होतात. तेथे तुम्ही आमच्याकडून २० हजार रुपये घेतल्याचे सांगत ब्लॅकमेल केले. बदनामीच्या भीतीने पैसे देतील, असे आरोपींना वाटत होते. धमकावल्यावर आरोपींनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून दोघे आमचे पैसे देत नसल्याची तक्रार केली.
पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर अभियंत्याने आरोपी आपल्याकडे जबरदस्तीने २० हजार रुपये मागत असल्याचे सांगितले. यात काहीतरी गडबड असल्याचे लक्षात येताच नांदेड सिटी पोलिसांनी फिर्यादी आणि दोघा आरोपींना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले. दोघे बुधवार पेठेत आले असता, त्यांना समोरच्याला ऑनलाइन पैसे द्यायचे नव्हते, त्यासाठी त्यांनी आमच्याकडे २० हजारांची रोकड मागितली. त्यांना आम्ही पैसे दिले. हे पैसे ऑनलाइन परत करण्याऐवजी त्यांनी धक्का मारून पळ काढल्याचेही आरोपींनी सांगितले.
फिर्यादी आणि मित्राकडे चौकशी केली, तेव्हा त्यांनी आरोपींकडून पैसे घेतले नसल्याचे सांगितले. पोलिसांनी बुधवार पेठ, फिर्यादी जेवणासाठी थांबलेल्या हॉटेलपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर सत्य प्रकाशात आले. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली.





