Pune Jewellery stolen Video: खरेदीच्या बहाण्याने सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दाजी-मेहुणीला लष्कर पोलिसांनी केले गजाआड

पुणे – सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने दागिने चोरणाऱ्या तरुणीसह साथीदाराला लष्कर पोलिसांनी गजाआड केले. चोरट्यांनी पुणे, मुंबई, ठाणे, सातारा तसेच सिंधूदुर्ग परिसरातील सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्यााने चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.
शेखर हेमराज वाणी ( ३२ रा. मांजरी, हडपसर), शिवानी दिलीप साळुंखे ( २४, रा. केशवनगर, मुंढवा, मूळ रा. अकलूज. जि.सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. लष्कर भागातील एका सराफी पेढीत ३१ ऑक्टोबर रोजी खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या तरुणीने दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तरुणीसह साथीदाराने खरेदीचा बहाणा करुन सराफी पेढीतून दागिने चोरल्याचे तपासात उघडकीस आले.
त्यानंतर पसार झालेल्या दोघांचा शोध सुरू करण्यात आला. सराफी पेढीत चोरी करणारी तरुणी आणि साथीदार दुचाकीवरुन मुंढव्याकडे पसार झाले. पोलिसांनी दोघांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. आरोपी शेखर, त्यांची साथीदार यांनी नऊ ठिकाणी गुन्हे केले आहेत.
Pune Jewellery stolen Video: खरेदीच्या बहाण्याने सोन्याचे दागिने चोरणाऱ्या पती-पत्नीला लष्कर पोलिसांनी केले गजाआड pic.twitter.com/1bpzyA68cy
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) November 12, 2024
शेखर हा शिवानी ही त्याची मेहुणी असल्याचे सांगत आहे. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त दीपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, सहायक निरीक्षक विशाल दांडगे, अंमलदार महेश कदम, संदीप उर्किडे, सोमनाथ बनसाेडे, रमेश चौधर, सचिन मांजरे, लोकेश कदम, अलका ब्राम्हणे, हराळ आणि कोडिलकर यांनी ही कामगिरी केली.
आरोपी सराफी दुकानात जाऊन दागिने खरेदीचा बहाणा करायचे. सेल्समनला दागिने दाखविण्यात गुंतवल्यावर एखादा दागिने गुपचुप हातात लपवून खिशात टाकला जायचा. यानंतर दागिने आवडले नसल्याचे सांगत निघुन जायचे. त्यांनी लष्कर परिसरातील दुकानातून ९५ हजाराचे तीन टॉप्स चोरुन नेले होते.





