मंचर परिसरातील तीन बिबट्यांचा व्हिडिओ फेक

वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मनस्ताप
मंचर : शहरातील बेंडेमळा वस्तीवर तीन बिबटे आढळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता; मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांना या व्हिडिओबाबत शंका आल्याने त्यांनी खातर जमा केली. यामध्ये हा व्हिडिओ फेक असून तो दुसऱ्याच ठिकाणचा असल्याचे समोर आले आहे; मात्र बेंडेमळा परिसरात लहान बछड्याचा असलेला व्हिडिओ हा खरा असून या परिसरात बिबट मादीचा वावर असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.
बेंडेमळा, स्वामी समर्थ व मुंजाबा मंदिर परिसरात तीन बिबटे एकापाठोपाठ रस्ता पार करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हे बिबटे झुडपातून बाहेर येत असताना दिसत होते. परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अधिकाऱ्यांनी दखल घेत परिसरात पाहणी करत नागरिकांना सतर्क राहण्याचा आवाहन केले होते.
व्हायरल झालेल्या व्हिडिओ व बेंडेमळा येथील ठिकाण मिळते जुळते नसल्याने या व्हिडिओबाबत शंका उपस्थित झाल्याने मंचर वन परिमंडळ अधिकारी संभाजीराव गायकवाड यांनी खातरजमा केली. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तरुणास बोलावून त्याला गाडीत बसवून तू व्हिडीओ शूटिंग कोठे काढले, ते ठिकाण दाखवण्यास सांगितले. त्या तरुणाने हा व्हिडिओ मला दुसरीकडून आला असल्याचे सांगितले. व्हिडिओतील ठिकाण व बेंडेमळा येथील ठिकाण मिळते जुळते नसल्याने व्हिडिओ दुसऱ्याच ठिकाणचा असून तो व्हायरल केल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
व्हायरल व्हिडिओ दुसऱ्याच ठिकाणचा
मंचर शहरातील जुन्या महात्मा गांधी विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन बिबटे असल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच वनविभाग अधिकारी खडबडून जागे झाले होते. वनपरिक्षेत्राधिकारी प्रदीप रौंधळ यांनी वनखात्यातील कर्मचाऱ्यांना बिबट्याला जेरबंद करण्याच्या प्रक्रिया करण्यासाठी सूचना दिल्या होत्या.
वन विभागाचे अधिकारी रात्रीच्या वेळीग्रस्त घालत होते. तर नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या जात होत्या. रात्रीच्या वेळी बिबट्याने वस्तीकडे येऊ नये म्हणुन रात्रीची गस्त घालून आवाज केला जात होता. मात्र व्हिडिओ दुसऱ्याच ठिकाणचा असल्याचे लक्षात येताच व्हायरल व्हिडिओमुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मनस्ताप झाला आहे.





