Shirur : मुक्त वातावरणात गोरक्षण केंद्र उभारले
Shirur : माईंच्या कन्या ममता सपकाळ, दीपक गायकवाड, चंद्रकांत ढोरमले, संतोष मोरे, ॲड. बाबूराव पाचंगे उपस्थित होते.

शिरूर : अनाथ, निराधार मुलांचे संगोपन करतानाच देशी गाईंचा सांभाळ करण्याचा उपक्रम अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेने हाती घेतला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील जातेगाव (ता. पारनेर) येथे निसर्गरम्य परिसरात, मुक्त वातावरणात गोरक्षण केंद्र उभे केले आहे. दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांच्या भाकड जनावरांचेही याठिकाणी संगोपन केले जाणार असल्याने पुणे व नगर जिल्ह्यासह परिसरातील शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
द्वारकामाई गोरक्षण या नावाने उभ्या राहिलेल्या केंद्राचे उद्घाटन सिंधुताईंच्या संस्थेतील लहान बालकांनी गोमाता पूजनाने केले. माईंच्या आवडत्या भजनाच्या तालासूरात केंद्रातील गाईंचे विधीवत पूजन करून त्यांना गोड घास भरविला. यावेळी सिंधूताई सपकाळ यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
माईंच्या कन्या ममता सपकाळ, दीपक गायकवाड, चंद्रकांत ढोरमले, संतोष मोरे, ॲड. बाबूराव पाचंगे उपस्थित होते. दमदर ग्लोबल फाऊंडेशन मार्फत चालविण्यात येणाऱ्या गोरक्षण केंद्रात देशी गाईंचे संगोपन केले जाणार असल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष विनय सपकाळ यांनी सांगितले. सुरवातीच्या टप्प्यात २५ गाईंचे संगोपन करण्याची व्यवस्था केली असून, ही व्यवस्था टप्प्याटप्प्याने वाढविणार आहे.
यावेळी ममताताईंनी माईंच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. आईने अनाथ, निराधार मुलांचा सांभाळ करताना ऐन दुष्काळी स्थितीत, उजाड झालेल्या परिसरात देशी गाईंचा सांभाळ केला. त्यांच्या त्याच कार्याची जाणीव ठेवून आम्ही देखील आमच्या परीने गाईंचा सांभाळ करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. यश सपकाळ यांनी स्वागत केले. सीमा सपकाळ यांनी सूत्रसंचालन केले. सचिन ढोरमले यांनी आभार मानले.
मी आई झाले, तुम्ही गणगोत व्हा
देशी गोमातेचे संवर्धन व संरक्षण व्हावे, यासाठी माई आयुष्यभर प्रयत्नशील होत्या. त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत गोमातेच्या सेवेला प्राधान्य दिले. माईंचे हेच सेवाकार्य पुढे नेण्यासाठी जातेगाव येथे गोरक्षण केंद्र सुरू केले आहे. मी आई झाले, तुम्ही गणगोत व्हा, असे माई नेहमी म्हणायच्या. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत समाजाने माईंच्या कार्याचे गणगोत बनावे, देशी गोमातेच्या संवर्धनासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन माईंच्या कन्या ममता सपकाळ यांनी केले आहे.





