Pune District : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट
Pune District : या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य करण खलाटे, पंचायत समिती सदस्य दिग्विजय जगताप, जितेंद्र पवार, आशा वायाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांच्यासह विविध गावांचे सरपंच आणि जन आरोग्य समितीचे सदस्य उपस्थित होते.

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यात सध्या निर्माण झालेल्या तीव्र दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. याच अनुषंगाने होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य समितीची त्रैमासिक बैठक पार पडली. दुष्काळामुळे उद्भवणारे साथीचे आजार, डेंग्यू, दूषित पाण्यामुळे होणारे आजार तसेच सर्पदंश व श्वानदंश यांसारख्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना राबविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य करण खलाटे, पंचायत समिती सदस्य दिग्विजय जगताप, जितेंद्र पवार, आशा वायाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांच्यासह विविध गावांचे सरपंच आणि जन आरोग्य समितीचे सदस्य उपस्थित होते.
निंबुतमधील डेंग्यूची परिस्थिती नियंत्रणात
काही दिवसांपूर्वी निंबुत परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या होत्या. आरोग्य पथकाकडून जवळपास ४८८ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये डेंग्यूचे पाच रुग्ण आढळून आले होते. मात्र, आरोग्य विभागाच्या सतर्कतेमुळे आणि प्रभावी उपाययोजनांमुळे परिस्थिती नियंत्रणात आली असून, कालपासून एकही नवीन रुग्ण आढळलेला नसल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
घरोघरी सर्वेक्षण
दुष्काळाच्या काळात पाणीटंचाई, साठवून ठेवलेले पाणी आणि अस्वच्छतेमुळे विविध साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत गावोगावी तसेच वाडी-वस्त्यांवर घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नागरिकांना ताप, अंगदुखी किंवा इतर आजारांची लक्षणे जाणवल्यास तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतींनी गावात धुराळणी (फॉगिंग) करावी, तसेच नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळून घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नये, असे निर्देश देण्यात आले.
शुद्ध पाणीपुरवठा आणि औषधसाठ्यावर भर
पाण्यामुळे होणाऱ्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होण्यावर विशेष लक्ष दिले जात आहे. तसेच सर्पदंश, श्वानदंश आणि विविध साथीच्या आजारांवरील उपचारांसाठी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करून देण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली होळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तत्परतेने काम करत आहेत. दुष्काळाच्या परिस्थितीत नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, कोणताही आजार अंगावर काढू नये आणि आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन जन आरोग्य समितीच्या बैठकीत करण्यात आले.





