Pune District : पाच प्रश्नांच्या निराकारणासाठी भोईटे आग्रही
Pune District : निवेदनांची दखल घेतल्याबद्दल भोईटे यांनी सचिन अहिर यांचे आभार मानले. या पाचही विषयांवर प्रत्यक्ष कार्यवाही होण्यासाठी संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खुटबाव : दौंड तालुक्यातील पाणीटंचाई, रस्ता सुरक्षा, वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुविधांशी संबंधित पाच विषयांबाबत शिवसैनिक समीर पोपटराव भोईटे यांनी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांची भेट घेऊन निवेदने सादर केली. अहिर यांनी ही निवेदने पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागांना मार्क करून दिली आहेत. त्यामुळे या प्रश्नांच्या निराकरणाबाबत दौंड तालुक्यात नागरिक आशावादी बनला आहे.
चौफुला चौकातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याबाबत यापूर्वी दिलेल्या निवेदनाचा पाठपुरावा करून पुन्हा निवेदन देण्यात आले. केडगाव दुय्यम निबंधक कार्यालयातील वाहनतळ व स्वच्छतेच्या समस्यांवर कार्यवाही व्हावी, यासाठीही पुन्हा निवेदन सादर करण्यात आले.
खोर- डोंबेवाडी तलावात आवर्तनाचे पाणी सोडण्यासाठी यापूर्वी निवेदन देण्यात आले होते. यावेळी तलावासाठी बंदिस्त पाइपलाइनची व्यवस्था करण्याच्या मागणीचे स्वतंत्र निवेदन सादर करण्यात आले. पडवी येथील गायकवाड मळा परिसरात उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई आणि टँकरवरील अवलंबित्व लक्षात घेऊन, स्थानिक तलावात पाणी आणण्यासाठी तांत्रिक पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनांची दखल घेतल्याबद्दल भोईटे यांनी सचिन अहिर यांचे आभार मानले. या पाचही विषयांवर प्रत्यक्ष कार्यवाही होण्यासाठी संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महामार्ग, तीव्र उतार याकडे लक्ष वेधले
अष्टविनायक महामार्गावरील केडगाव उड्डाणपूल परिसर, पारगाव व पडवी पाटी येथील तीव्र उतार, केडगावमधील जुना टोलनाका चौक आणि सुपा घाटातील अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली. रस्त्यावरील खड्डे बुजविणे, परावर्तक व दिशादर्शक फलक बसविणे, गावे, वस्त्या, शाळा व कारखान्यांच्या परिसरात योग्य वेगनियंत्रण उपाय करणे या बाबींकडे लक्ष वेधण्यात आले.





