Purandar : पोस्टातर्फे पेन्शनर्ससाठी विशेष मोहीम
Purandar : ही सुविधा सशुल्क असून, अवघ्या ७० रुपयांच्या नाममात्र दरात बारामती विभागांतर्गत येणाऱ्या बारामती, इंदापूर, सासवड, दौंड व शिरूर तालुक्यातील सर्व ग्रामीण भागांतील शाखा डाकघरे, सब पोस्ट ऑफिस तसेच बारामती मुख्य डाकघरात पोस्टमन व ग्रामीण डाकसेवकांच्या माध्यमातून दिली जात आहे.

गराडे : पुरंदर तालुक्यातील केंद्र व राज्य सरकारच्या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात पेन्शन सुरू ठेवण्यासाठी हयातीचा दाखला (डिजिटल लाइफ सर्टिफिकेट) सादर करणे अनिवार्य असते. या पार्श्वभूमीवर, भारतीय डाक विभाग आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या वतीने नॅशनवाईड डिजिटल लाइफ सर्टिफिकेट मोहीम ५.० (DLC Campaign 5.0) १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. यापूर्वी अनेक पेन्शनर्सचे बोटांचे ठसे स्पष्ट न उमटल्यामुळे बायोमेट्रिक पडताळणीत अडचणी येत होत्या. ही समस्या लक्षात घेऊन आता हयातीचा दाखला सादर करण्यासाठी फेस ऑथेंटिकेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने ज्येष्ठ पेन्शनर्सना दिलासा मिळणार आहे.
यासाठी सर्व केंद्र, राज्य, रेल्वे तसेच विविध विभागांच्या पेन्शनधारकांनी आपला आधार क्रमांक, पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO No.) व मोबाईल क्रमांक या माहितीसह नजीकच्या पोस्टातील पोस्टमन किंवा ग्रामीण डाकसेवकांमार्फत या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बारामती विभागाचे अधीक्षक डाकघर केतन डी. शित्रे, शाखा प्रबंधक व क्लर्क (इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक) स्वप्नील सावंत यांच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबतची माहिती सासवड उपविभागाचे डाक निरीक्षक योगेश वीर यांनी दिली आहे.
अवघ्या ७० रुपयांचे शुल्क
ही सुविधा सशुल्क असून, अवघ्या ७० रुपयांच्या नाममात्र दरात बारामती विभागांतर्गत येणाऱ्या बारामती, इंदापूर, सासवड, दौंड व शिरूर तालुक्यातील सर्व ग्रामीण भागांतील शाखा डाकघरे, सब पोस्ट ऑफिस तसेच बारामती मुख्य डाकघरात पोस्टमन व ग्रामीण डाकसेवकांच्या माध्यमातून दिली जात आहे. याद्वारे पेन्शनर्सना पोस्टमन अथवा ग्रामीण डाकसेवकांना घरी बोलावून किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ऑनलाइन पद्धतीने हयातीचा दाखला सादर करता येणार आहे.





