Mamata Banerjee : “पिडितांना बाजू मांडण्याची संधीच नाही…”; एसआयआर प्रक्रियेवरून ममता बॅनर्जी आक्रमक
Mamata Banerjee : बंगालमधील एसआयआर प्रक्रियेच्या कथित पीडितांसोबत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बॅनर्जी म्हणाल्या....

Mamata Banerjee –पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेवर तीव्र टीका करत, या प्रक्रियेतील ‘पीडितांना’ स्वतःची बाजू मांडण्याची संधी दिली जात नसल्याचा आरोप केला.
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ही प्रक्रिया राबवण्यामागील हेतू संशयास्पद असल्याचेही त्यांनी म्हटले.दिल्ली येथे बंगालमधील एसआयआर प्रक्रियेच्या कथित पीडितांसोबत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बॅनर्जी (Mamata Banerjee) म्हणाल्या, आमच्या मागे बसलेले सर्व लोक एसआयआरचे बळी आहेत. हे काही मोजके लोक नसून लाखो नागरिकांचे प्रतिनिधित्व करतात.
एसआयआर प्रक्रियेमुळे अनेक खरे मतदार मतदार यादीतून वगळले जात असून त्यांना आपली बाजू मांडण्याची किंवा स्वतःचा बचाव करण्याची संधीच दिली जात नाही, असा आरोप त्यांनी केला.
एसआयआरच्या वेळेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी विचारले की, विधानसभा निवडणुकांच्या अगदी आधीच ही प्रक्रिया का राबवली जात आहे. निवडणूक-सज्ज चार राज्यांपैकी तीन राज्यांमध्ये एसआयआर केले जात आहे, मात्र भाजपशासित आसाममध्ये नाही. हे निवडक राज्यांपुरतेच का मर्यादित आहे?” असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
सोमवारी ममता बॅनर्जी आणि इतर तृणमूल काँग्रेस नेत्यांनी एसआयआर पीडितांना घेऊन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची भेट घेतली होती. मात्र, त्या बैठकीत शिष्टमंडळाचा अपमान झाल्याचा दावा करत बॅनर्जी यांनी निषेध म्हणून बैठक अर्धवट सोडली आणि निवडणूक आयोग भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला. चाणक्यपुरीतील बंग भवनातही त्यांनी पीडितांची भेट घेऊन, न्याय मिळेपर्यंत त्यांचा लढा सुरूच राहील, असे आश्वासन दिले.






