Mamata Banerjee : बंगालमध्ये एसआयआरच्या धास्तीने 110 जणांचा मृत्यू; ममता बॅनर्जी यांचा दावा
पश्चिम बंगालमध्ये मतदारयाद्या पडताळणीमुळे (एसआयआर) प्रचंड धास्ती निर्माण झाली. त्यातून विविध कारणांनी सुमारे ११० जण मृत्युमुखी पडले, असा दावा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केला

कोलकता : Mamata Banerjee. कोलकत्यात गुरूवारपासून आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शन सुरू झाले. त्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना ममतांनी एसआयआरचा मुद्दा उपस्थित केला.
वृद्ध व्यक्तींसह अनेकांना सुनावणीसाठी एसआयआर शिबिरांमध्ये रांगा लावाव्या लागत आहेत. त्यांना मोकळ्या जागेत ५ ते ६ तास प्रतीक्षा करणे भाग पडत आहे. तार्किक विसंगतींच्या नावाखाली निवडणूक आयोग बंगाली जनतेच्या आडनावांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. अनेक वर्षांपासून ती आडनावे ज्ञात आहेत. तसेच स्वीकारली गेलेली आहेत.
मी ममता बॅनर्जी आणि ममता बंडोपाध्याय या दोन्ही नावांनी ओळखली जाते. चटर्जी आणि चटोपाध्याय हे समान आडनाव आहे. ठाकूर हे आडनाव ब्रिटीशांच्या राजवटीत टागोर म्हणून ओळखले गेले. गुरूदेव रविंद्रनाथ टागोर हयात असते; तर कदाचित त्यांनाही आताच्या स्थितीला सामोरे जावे लागले असते, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
अनेक ज्येष्ठांना त्यांच्या नेमक्या जन्मतारखा सांगता येऊ शकत नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. एसआयआरमुळे मतदारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांच्या वेदनांवर मी २६ कविता लिहिल्या आहेत. संबंधित कवितांच्या पुस्तकाचे प्रकाशन आताच्या प्रदर्शनात केले जाईल, अशी माहितीही ममतांनी दिली.





