शाब्दिक चकमक: ‘त्या’ पार्ट टाईम अध्यक्षा: रोहिणी खडसेंची बोचरी टीका, चाकणकर म्हणाल्या दिव्याखाली अंधार असलेल्यांनी…

Rohini Khadse | Rupali Chakankar | वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले असून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अशातच आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या काळात महिलांना अपेक्षित असलेला न्याय मिळत नसल्याने अनेक महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत, असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केला आहे. तसेच रुपाली चाकणकर या पार्ट टाईम अध्यक्षा असल्याची बोचरी टीका देखील रोहिणी खडसे यांनी केली आहे. यामुळे खडसे आणि चाकणकर यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक जुंपली आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींवर सौम्य कलम लावली आहेत, भविष्यात त्यांना जामीन मिळू शकतो. यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करू नये अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली आहे. तर दिव्याखाली अंधार असलेल्यांनी बोलू नये, असा खोचक टोला रुपाली चाकणकर यांनी खडसे यांना लगावला आहे.
महिला आयोगावर कार्यक्षम महिला अध्यक्षा नेमण्यात याव्या, अशी मागणी रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठ्या सुनेने देखील आपली छळवणूक झाल्याचे म्हटले होते. तसेच महिला आयोगाने तक्रारीची दखल घेतली नसल्याचे म्हटले होते. यामुळे महिला आयोगाच्या कारभारावर विविध प्रश्न निर्माण झाले होते. यावर बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या आपल्या सासऱ्याच्या विरोधात केलेल्या तक्रारीवर जर महिला आयोगाने त्याचवेळी दखल घेतली असती तर आज वैष्णवी जिवंत राहिली असती.
काय म्हणाल्या रोहिणी खडसे?
वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोपींवर लावण्यात आलेली कलमे ही किरकोळ स्वरूपाची असल्याने पुढील काळात आरोपी सुटू शकतात. या आरोपींवर गंभीर कलमे लावण्यात याव्यात. त्याचबरोबर या घटनेत बार कौन्सिलने आरोपीचं वकील पत्र घेऊ नये, अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली आहे. तसेच राज्यात हुंडाबळी होऊन नये यासाठी आम्ही राज्यभर महिलांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.





