Vehicle purchases : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहनखरेदीला जोर; इलेक्ट्रिक कार आणि दुचाकी वाहनांना पसंती असल्याने वाहन खरेदीचा उच्चांक

Vehicle purchases : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या स्वागताला वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. यंदाही पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरांतील विविध शोरूममध्ये वाहनाचे बुकिंग करण्यासाठी पुणेकरांची लगबग सुरू आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांसह टुरिस्ट वाहनांना मागणी वाढली आहे.
इलेक्ट्रिक कार आणि दुचाकी वाहनांनाही पसंती मिळत असल्यामुळे यंदाही वाहन खरेदी उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. पुणे शहराने आता दुचाकींचे शहर अशी नवी ओळख निर्माण केली असून, दुचाकीबरोबरच चारचाकी वाहनांची संख्याही शहरात वाढत आहे. त्यामध्ये पेट्रोल आणि इलेक्ट्रिक कारला मोठी मागणी वाढली आहे. वाहनांच्या खरेदी-विक्रीसाठी अनेकांकडून शुभ मुहूर्त पाहिला जातो.
दसरा, दिवाळी, अक्षय तृतीया आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन वाहन खरेदीला पुणेकर पसंती देतात. दरवर्षी सण-उत्सवांमध्ये साधारणतः १० ते १५ हजार नवीन वाहनांची नोंद होते. वर्षभरात पावणेतीन ते तीन लाख वाहनांची नोंद केली जाते.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीची संख्या वाढण्यासाठी विविध कंपन्यांच्या शोरूमकडून विशेष ऑफरही दिल्या जातात. यंदाही वाहनांच्या बुकिंगसाठी नागरिकांनी शोरूममध्ये गर्दी केली आहे.
‘या वर्षीही टीव्हीएसच्या पेट्रोल आणि इलेक्ट्रिक दुचाकीला नागरिकांची मोठी मागणी आहे. त्यामध्ये ज्युपिटर, आपाची आरटीएक्स यांना अधिक मागणी आहे. मागणीच्या तुलनेत वाहने उपलब्ध असली, तरी वाहनांचे माॅडेल आणि रंग मिळवून देताना तारेवरची कसरत होत आहे. गुढीपाडव्याला पुण्यातील सातही शोरूममधून २२०० ते २३०० गाड्यांची विक्री होईल.’ – प्रदीप सावंत, सीईओ, टीव्हीएस शेलार
‘इलेक्ट्रिक गाड्यांना अधिक मागणी असून, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दीडशेहून अधिक कारची डिलिव्हरी आहे. मागील चार ते पाच दिवसांत बुकिंग वाढले आहे.’- अमोल सोमा, जनरल मॅनेजर, बी.यु.भंडारी
‘मागील दोन महिन्यांच्या तुलनेत गुढीपाडव्याला गाड्यांना अधिक मागणी वाढली असून, आठ दिवसांपासून बुकिंगची संख्या वाढत आहे. पुढील दोन दिवसांत ३५ ते ५० गाड्यांची डिलिव्हरी करण्याचे नियोजन असून, बुकिंग सुरू आहे.’ – विक्रांत आचार्य – जनरल मॅनेजर, डेक्कन होंडा





