पुणे | घाऊक बाजारात भाज्या स्वस्त : तर किरकोळ बाजारात कडाडल्या

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जिल्ह्यसह संपूर्ण पुणे विभागात पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी, शेतमालाची काढणी झालेली नाही. त्यामुळे मार्केट यार्डात आवक घटली आहे. ४० टक्केच आवक होत आहे. मालाला उठाव नाही. परिणामी, सर्व भाज्यांच्या भावात १० ते २० टक्क्यांनी घट झाली आहे. तर, किरकोळ बाजारात मात्र भाज्यांचे भाव कडाडले आहेत.
पावसामुळे भिजलेल्या आणि दर्जाहिन मालाची आवक होत आहे. पावसात भिजल्याने माल लवकर खराब होतो. विक्री होईल की नाही, या शक्यतेने किरकोळ विक्रेत्यांनी कमी माल खरेदी केला आहे. काही विक्रेत्यांनी तर पावसामुळे दुकाने बंद ठेवली आहेत. उद्या (शनिवार दि. २७) भाजी मार्केट बंद आहे.
त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांचे भाव कडाडले आहेत. किरकोळ बाजारात भाज्यांची १०० ते १४० रुपये किलो भावाने विक्री होत आहे. तर, पालेभाज्यांची विक्री ३० ते ५० रुपये जुडी भावाने होत असल्याचे मार्केट यार्डातील किरकोळ विक्रेते संघटचे प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले. फळ-भाजीपाला विभागात गटप्रमुख नितीन चौरे, दादासाहेब वरघडे, दीपक थोपटे आणि संतोष कुंभारकर काम पाहत आहेत.
जिल्ह्यासह पुणे विभागात सुरू असलेल्या पावसाचा फटका मार्केट यार्डातील भाजीपाला आवकवर झाला आहे. मागील चार दिवसांपासून आवक कमी होत आहे. शुक्रवारी (दि. २६) नेहमीच्या तुलनेत ४० टक्केच आवक झालेली आहे. – बाळासाहेब कोंडे, विभागप्रमुख, फळ-भाजीपाला विभाग, बाजार समिती
भाजीपाला विक्रेते जास्त प्रमाणात रस्त्यावर माल विकतात. पावसामुळे मालाची विक्री होणार नाही, या शक्यतेने कमी प्रमाणात खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनी माल कमी खरेदी केली आहे. पाऊस बंद झाल्यानंतर शेतमालाची आवक पूर्ववत होईल. – अमोल घुले, माजी उपाध्यक्ष, अडते असोसिएशन.




